श्री विठ्ठलाची विविधत पूजा करून देवाच्या शयनगृहातील पलंग गुरुवारी काढण्यात आला. यामुळे कार्तिकी विठ्ठलाच्या यात्रेसाठी दर्शनासाठी भाविकांना मंदिर २४ तास खुले राहणार आहे. यामुळे भाविकांना २४ तासांत केव्हाही दर्शन घेता येणार आहे. पंढरपुरात येत्या २३ नोव्हेंबरला कार्तिकीचा सोहळा होणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपुरात येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
मंदिर काही तास बंद असल्याने व विठ्ठलाचे दर्शन बंद असल्याने अनेक भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागते. तसेच दर्शनासाठीही अधिक तास रांगेत थांबावे लागते. यामुळे यात्रेच्या कालावधीत २४ तास विठ्ठलाचे दर्शन सुरू केले आहे. कार्तिकी यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी विठूराया अखंड उभे राहतात. त्यासाठी विशेष दर्शन मंडप तयार केला आहे. प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचचली आहेत. दरम्यान, कार्तिकीनिमित्त भाविकांना ३० नोव्हेंबरपर्यंत विठूरायाचे २४ तास दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.