Pune : राज्यातील ३८ कृषी उत्पादने आणि कृषी उत्पादनांपासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यात आता आणखी एका उत्पादनाची भर घातली गेली असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाने कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ३ वर्षापासुन जुन्नर आंबेगाव हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला यश प्राप्त झाले. नुकतेच भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन पत्रिकेत प्रकाशित झाल्यानुसार शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे याची स्वीकृती झाल्याचे समजले.
हे मानांकन मिळविण्यासाठी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या माध्यमातून २०२१ मध्ये पहिल्यांदा चेन्नई येथील भौगोलिक मानांकन कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्राने शिवनेरी हापूस आंब्या विषयी सखोल अभ्यास करून शास्त्रीय माहिती गोळा केली. तसेच मागील ४ हजार वर्षांचा इतिहास तपासून तत्कालीन हापूस बागेचा इतिहासातील नोंदी सापडून अर्जात समविष्ट केल्या.
जुन्नर शिवनेरी हापूस इतर जिल्ह्यातील व राज्यांतील हापूस आंब्यापेक्षा वेगळा आहे हे कागदोपत्री सिद्ध केले. यासर्व बाबींची कंसल्टटेतिव ग्रुप कमिटीने सखोल शहानिशा करून तपासणी केली. येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तरे करून जमा केलेली माहितीची पुष्टी केली. यासर्व माहितीची खातरजमा करून शिवनेरी हापूस आंब्याच्या प्रस्तावाला भौगोलिक उपदर्शन पत्रिकेतून प्रसिध्दी दिली. सदरील मिळालेली प्रसिध्दी एकप्रकारे जुन्नरच्या हापूस आंब्याला मिळालेले मानांकन होय.
याबाबत कृषिरत्न मेहेर म्हणाले की, शिवनेरी हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी मिळालेली स्वीकृती हा जुन्नर आंबेगाव तालुक्यातील तमाम आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आहे. यामुळे याभागातील आंबा साता समुद्राच्या पलिकडे जाऊन जगात शिवनेरी हापूसला ओळख मिळेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात होईल. याभागात हापूस आंब्याच्या क्षेत्र वाढीमध्ये होऊन एकंदरीत देशाच्या उत्पादनात फायदा होईल.
सदरील मानांकन मिळविण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, मा. मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याकामी विशेष सहकार्य केले. या कामी जी आय अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी तांत्रिक व कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन केले.
तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, कृषी अधिकारी गणेश भोसले, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ प्रशांत शेटे, भारत टेमकर, प्रा. डॉ. लहू गायकवाड, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, प्रा. स्वप्नील कांबळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रदीप चव्हाण यांनी विशेष कष्ट घेतले.
या विशेष प्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, अध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे, डी. के. भुजबळ, ऋषिकेश मेहेर, सुखदेव बनकर, रत्नदीप भरवीरकर, तानाजी वारुळे यांनी भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी करत असलेल्या सर्व टीमचे अभिनंदन केले.
शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांना खालील फायदे होतील
- अधिकचा बाजारभाव : मानांकनामुळे हापूस आंब्याची गुणवत्ता आणि मूळ ओळख सिद्ध होईल. त्यामुळे बाजारात त्याला अधिकचा बाजारभाव मिळेल.
- ब्रँडिंग : हापूस आंबा एक ब्रँड म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे त्याची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांची उत्पन्न वाढेल.
- निवड : खरेदीदारांना खरा हापूस आंबा ओळखण्यास सोपे जाईल. त्यामुळे खोट्या हापूस आंब्यांना बाजारात कमी जागा मिळेल.
- निर्यात : मानांकनामुळे हापूस आंब्याची निर्यात वाढेल आणि शेतकऱ्यांची उत्पन्न वाढेल.
- आर्थिक स्थिरता : हापूस आंबा हा शेतकऱ्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. मानांकनामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल.
- थोडक्यात, शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या उत्पादनाला जागतिक ओळख मिळेल.