शेती करताना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली असून, प्रशासकीय कारणास्तव दोन वेळा ही योजना खंडित झाली होती.
या खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकार विमा कंपन्यांना प्रिमियम देत होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने गेल्या वर्षी विमा योजनेचे सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केले. त्यामुळे राज्य सरकारकडून हे अनुदान आता थेट शेतकऱ्यांना देण्यात येते.
प्रशासकीय कारणास्तव ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या कालावधीसाठी प्राप्त झालेल्या १६२ दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात १५५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर ७ जणांना अपंगत्व आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
काय आहे योजना?राज्य सरकारने २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. त्यानुसार अपघाती मृत्यूंमध्ये शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपये, अपंगत्व आल्यास २ लाख किंवा १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी क्लिक करा.