राजाराम लोंढे
कोल्हापूर : गोपीनाथ मुंडेशेतकरीअपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे ८१ लाख रुपये कृषी विभागाच्या खात्यावर गेली सहा महिने पडून आहेत.
पात्र ४१ लाभार्थ्यांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही नवीन पोर्टलच्या तांत्रिक कारणामुळे पैसे वर्ग होत नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे, पण गेली सहा महिने न सुटणारे अवघड तांत्रिक कारण कोणते? हा खरा प्रश्न असून, आता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना मदत देण्यासाठी शासनाने डिसेंबर २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली.
अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाखांपर्यंत मदत मिळते; पण या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणे, या बाबी समोर आल्याने शासनाने या योजनेत बदल करून 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' सुरू केली.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांची मदत मिळते. जिल्ह्यात वर्षभरात शंभरहून अधिक प्रस्ताव दाखल झाले, पण त्यातील ४१ पात्र ठरले. कागदपत्रांची पूर्तता करूनही सहा महिने अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
नवीन पोर्टलला तांत्रिक अडचण आल्याने पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग होत नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पण, ही अडचण केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागालाच कशी येते? हा खरा प्रश्न आहे.
मार्चपासून नुसते आश्वासनच घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याचे कुटुंब उघड्यावर पडते. नातेवाईक ढीगभर कागदपत्रे गोळा करून कृषी विभागाकडे प्रस्ताव देतात. या पैशांतून कुटुंबे उभा राहील, अशी अपेक्षा असते.
मात्र, अनुदानासाठी मार्चपासून हेलपाटे मारून मारून शेतकरी वैतागला आहे. या आठवड्यात होईल, या आश्वासनापलीकडे त्याच्या पदरात काहीच पडलेले नाही.
अनुदानाचे ३.८१ कोटी कृषी विभागाकडे
गेल्या वर्षभरातील ४१ प्रस्तावांचे ८१ लाख पडून आहेतच, त्याशिवाय चालू आर्थिक वर्षातील १५० प्रस्तावांचे ३ कोटी रुपयेही कृषी विभागाच्या खात्यावर आले आहेत.
अनुदानाचे पैसे कृषी विभागाच्या खात्यावर आले आहेत; पण पोर्टल व्यवस्थित सुरू नसल्याने संबंधितांच्या खात्यावर वर्ग होत नाही. थोड्याच दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न राहील. - जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी