गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात विमा योजनेच्या एप्रिल २२ ते ऑगस्ट २२ या कालावधीतील प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिली असून सुमारे २४५३ शेतकरी, त्यांचे वारसदार यांच्या खात्यावर विम्याच्या दाव्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २४५३ पैकी ४९ शेतकऱ्यांना अपघातानंतर अपंगत्व आले असून उर्वरित शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आजच कृषी विभागाने हा शासनआदेश काढला आहे.
म्हणून होती आवश्यकता
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दि.७.०४.२०२२ पासून लागू करणे आवश्यक होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही योजना दि.०७.०४.२०२२ पासून लागू होऊ शकली नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत दि.०७.०४.२०२२ ते दि.२२.०८.२०२२ या खंडीत कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याशिवाय दि.२३.०८.२०२२ ते १८.०४.२०२३ या खंडीत कालावधीसाठीही पात्र दावे मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार या २३९ दिवसाच्या खंडीत कालावधीतील पहिल्या व दुसऱ्या टप्यातील पात्र प्रस्तावांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांना आर्थिक मदतीची रक्कम शासनामार्फत अदा करण्यासाठी एकूण रु ४७.१२. कोटी इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यांनाही मिळणार दाव्याचे पैसे
त्या अनुषंगाने पहिल्या टप्यातील २३९ (२३७ मृत्यु + २ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४.७६ कोटी व दुसऱ्या टप्प्यातील २१३७ (२०९४ मृत्यु + ४३ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४२.३६ कोटी अशी एकूण रु.४७.१२ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास शासनाने शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दिनांक ०७.०४.२०२२ ते २२.०८.२०२२ या १३८ दिवसाच्या खंडीत कालावधीतील ७७ (७३ मृत्यु + ४ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रु.१.५१ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यासाठीही मान्यता देण्यात आली आहे.
अशी आहे योजना
राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने हि योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान “शेतकरी जनता अपघात विमा योजना” असे करण्यात आले. सन २०१५-१६ पासून सदर योजनेचे नामाभिधान “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” Gopinath Munde apghat vima yojanaअसे करण्यात आले.
योजनेचे स्वरुप
शासन निर्णय दिनांक १९ एप्रिल २०२३. सदर योजनेत राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा, अविवाहीत मुलगी) यांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा १० ते ७५ वर्षे.
योजनेतंर्गत देण्यात येणारी मदत
अपघाती मृत्यू: रु. २.०० लाख
दोन डोळे/दोन अवयव निकामी होणे: रु. २.०० लाख
एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे: रु. १.०० लाख