Join us

Goverment Milk Powder Project Udgir : आशिया खंडापर्यंत पोहोचलेल्या उदगीर दूध भुकटी प्रकल्पास दृष्ट! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 1:24 PM

एकेकाळी येथील शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहोचून उदगीरची ओळख जगाच्या नकाशावर झाली होती. वाचा सविस्तर (Goverment Milk Powder Project Udgir)

Goverment Milk Powder Project Udgir :

व्ही.एस. कुलकर्णी

एकेकाळी येथील शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहोचून उदगीरची ओळख जगाच्या नकाशावर झाली होती. मात्र, त्यास दृष्ट लागल्याने आता उदगीरकरांवर पश्चिम महाराष्ट्रातून दररोज येणाऱ्या ३५ हजार लिटर्स पिशवी बंद दुधाची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.

उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाचे दोनदा पुनरुज्जीवन झाले. पण, शासनाने दुर्लक्ष केल्याने सध्या या प्रकल्पात भुकटीऐवजी केवळ अंगाराच उरलेला आहे. आता हा उरलेला अंगारा लिलावात निघाला असून, त्याची किंमत १ कोटी १० लाख इतकी ठरली आहे.

उदगीरात १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते सुरू झालेला दूध भुकटी प्रकल्प २५ वर्षे सुरू होता. ५५० कर्मचाऱ्यांना थेट रोजगार व याहून अधिक हजारो हातांना रोजगार देण्याचे काम या धवल क्रांतीने केले होते. 

मात्र, २३ जून २००२ पासून हा प्रकल्प कायमचा बंद पडला. उदगीरचे तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांनी हा बंद पडलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी विधानभवनासमोरउपोषणाचा मार्ग स्वीकारल्यानंतर राज्य शासनाने १ कोटी ६ लाखांचा निधी मंजूर केला. 

मात्र, एवढ्या रकमेत पुनरुज्जीवन होत नसल्यामुळे आ. चंद्रशेखर भोसले व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी पुढाकार घेऊन २५०.८३ लाख रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले. त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला.

पण, अवघ्या १५ दिवसातच या दूध भुकटी प्रकल्पाने अखेरचा श्वास सोडला. नंतर येथील प्रशासकीय यंत्रणेकडून हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला. यावर १ कोटी २३ लाख रुपये खर्चही करण्यात आले.

१९८६ साली जिल्हा दूध संघाची स्थापना

तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पी. जी. पाटील एकंबेकर यांनी येथे लातूर जिल्हा दूध संघाची स्थापना केली. या संघाकडून दूध भुकटी प्रकल्पास दररोज १२ हजार लिटर्स दूध पुरवठा होई. मध्यंतरी हा प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्याची घोषणा तत्कालीन दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली होती. मात्र, ती हवेतच विरली.

पुनरुज्जीवन समिती स्थापन...

हा प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी पुनरुज्जीवन समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या बैठकीत राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय, त्यांनी या समितीस राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांची भेट घालून नवी दिल्ली येथील एन.डी.डी.बी.च्या नावे २० सप्टेंबर २०२३ रोजी पत्रही मिळवून दिले.

या समितीने तत्कालीन खा. सुधाकर श्रृंगारे यांना सोबत घेऊन केंद्रीय दुग्ध विकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना येथे आणून सद्यःस्थितीत असलेल्या दूध डेअरीची पाहणी केली. या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ही डेअरी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

असा उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाचा प्रवास 

१९७८ : प्रकल्प सुरु

२००२ : प्रकल्प बंद

२००८ : प्रकल्पाचे पुनरुज्जीवन, मात्र १५ दिवसातच कायमचा बंद

२०२४ : प्रकल्पातील अंगार, भंगाराचा लिलाव

टॅग्स :शेती क्षेत्रउदगीरदूधदूध पुरवठा