पुरुष शेतकरी मरण पावल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अथवा त्याच्या पत्नीला आर्थिक मदत मिळायची. आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पत्नी बाळंतपणात मरण पावल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा दावा पत्र, सातबारा उतारा, ६-क (वारस नोंद), ६-ड (फेरफार), वयाचा पुरावा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अपंगत्व असल्यास अपंगाची टक्केवारी नमूद असलेले जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते.
काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास, अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास किंवा बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला आणि इतर प्रकरणात शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्याला दोन लाख रुपयांपर्यंत सानुग्रह रक्कम दिली जाते.
किती जणांना मिळाली मदत? कळंब तालुक्यात २०२३ मध्ये सहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये किसना विठ्ठल मगर (तरोडा), समीर भास्कर बोरकर (वडगाव), प्रकाश नानाजी क्षीरसागर (बऱ्हाणपूर), रामा पांडुरंग ठाकरे (डोंगरखर्डा), रामू ऊर्फ रामभाऊ सखाराम आंजीकर (पिंपळगाव), रणजित सुभाष यादव (धोत्रा) या अपघातात मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे.
बाळंतपणात मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाख प्रत्येक महिलेसाठी बाळंतपण हे एकप्रकारचा पुनर्जन्म असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे काहीवेळा बाळंतपणात महिलेचा अनपेक्षितपणे मृत्यू होतो. अशा स्थितीत त्यांचे कुटंब खचून जाते. आता या योजनेमध्ये महिलेच्या पतीलाही दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
निकष काय?रस्ता अथवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज पडून मृत्यू, सर्पदंश व विंचू दंश, उंचावरून पडून झालेला अपघात, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व खून यासोबत अन्य कोणताही अपघात झाल्यास या योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो.
२०२३ ला सहा प्रस्ताव२०२३ या वर्षात तीन प्रस्तावांवर लाभ देण्यात आला, तसेच तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये चार प्रस्ताव रस्ता अपघाताचे आहेत. सर्पदंश एक, तर झाडावरून पडून मृत्यूचा एक प्रस्ताव आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करून दिल्या जातात. तालुकास्तरावर समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून तालुका कृषी अधिकारी सचिव आहेत. तालुकापातळीवरच प्रस्तावास मंजुरात देण्याचे अधिकार आहे. त्यामुळे आर्थिक लाभ लवकर मिळतो. सुहास बेंडे, तालुका कृषी अधिकारी, कळंब