केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबवली जात आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याने चार पैसे जास्त कमावण्याची संधी उपलब्ध होत आहे.
धाराशीव जिल्ह्यात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होत नाही. मात्र, अनेकांकडे भांडवल नसल्याने उद्योगही उभारता येत नाही. आता केंद्र शासनानेच जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.
या योजनेत बेरोजगारांसह बचत गट, शेतकरी गट, संस्था आणि अॅग्रो कंपनीलाही अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, शासन एकूण कर्जावर ३५ टक्के सबसिडी देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही बेरोजगार आणि विविध संस्था व बचतगटांच्या सदस्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
कोणाला अर्ज करता येईल?
वैयक्तिक, बचत गट, शेतकरी गट, संस्था, अॅग्रो कंपनी यापैकी कोणालाही अर्ज करता येतो. सात बारा नसला तरी याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
शासनाकडून काय मदत मिळते?
शासनाकडून प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी एका कर्मचाऱ्याची मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे. प्रस्ताव दाखल करण्यापासून तर मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाते. उद्योग मंजूर झाल्यावर व्यवस्थित चालवायला शासन ३५ टक्के अनुदान देते.
काय आहे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना?
केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत केलेली ही प्राधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना आहे. असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योग योजना आहे. यामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारता येतात.
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी करा अर्ज?
अन्नप्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येते. या उद्योगासाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी अर्ज करू शकतात.
प्रक्रिया उद्योग सुरू...
योजनेच्या अंतर्गत २०२३-२४ व चालू वर्षात जिल्ह्यात अनेक लोकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यापैकी काही उद्योग सुरूही झाले आहेत. यामध्ये खवा, बेदाणा, मसाला, पापड उद्योगांचा समावेश आहे.
आपल्या जिल्ह्यात कच्चा माल मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करून माल विकणारे कमी आहेत. शासनाची ही चांगली योजना आहे. याचा लाभ घेऊन तुम्ही दोन पैसे जास्त तर कमावालच, इतर चार लोकांना रोजगारही देऊ शकता. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान