Join us

रब्बीसाठी पेरण्यांसाठी मिळते शासनाकडून कर्ज, अर्ज सुरू..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 2:34 PM

प्रशासन स्तरावरून बँकांना कर्जाबाबत सूचना

शासनाच्या वतीने  शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक कर्जाची उपलब्धता करून दिली जात आहे. चालू खरीप हंगामात एक लाख २० हजार ९७० शेतकऱ्यांना ८७५ कोटींहून अधिकचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या ७० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराकडे जावे लागू नये यासाठी शासनाच्या वतीने खरीप, रब्बी हंगामात पीक कर्जाची उपलब्धता करून दिली जात आहे. प्रत्येक वर्षी खरीप, रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँकांना उद्दिष्ट दिले जाते.

अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वेब्धी शासनाच्या वतीनेही सातत्याने पाठपुरावा केला जातो. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या जातात. सततच्या पाठपुराव्यामुळे चालू खरीप हंगामात उद्दिष्टाच्या ७० टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख २० हजार ९७० जणांना मिळाला असून, त्यांना ८७५ कोटी ८९ लाख ८९ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शिवाय रब्बी हंगामातही उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वाटप करावे, याबाबत शासन, प्रशासन स्तरावरून संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

खरिपासाठी ८७५ कोटींचे कर्ज वाटपचालू खरीप हंगामासाठी १२४९ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आजवर ८७५ कोटींचे वाटप झाले आहे.

५०१ कोटींचे उद्दिष्ट

खरिपात उद्दिष्टाच्या ७० टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ५०१ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

कर्जासाठी बँकांकडून अर्ज स्वीकारणे सुरु 

खरीप शेतकऱ्यांच्या हातचा गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे गरजेचे आहे. यासाठी अर्जाची स्वीकृती सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पीक कर्ज गतीने वाटप करा !

पीक कर्ज वेळेत वाटप व्हावे यासाठी जिल्हाधिकायांनी सूचना दिल्या आहेत. शिवाय वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या जात असून, अहवाल संकलित केला जातो.- पी. बी. वरखडे, सहायक निबंधक 

आम्हाला पीक कर्ज कोठे मिळते साहेब?

शासनाच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु विविध कारणांनी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात.- संदीप कदम, शेतकरी

शासनाची पीककर्जाची योजना चांगली आहे, परंतु, अनेक बँका विविध कारणे देत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. - रावसाहेब शिंदे, शेतकरी

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी

खरिपानंतर रब्बी हंगामात उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. या हंगामासाठी पीक कर्ज मिळावे म्हणूनही अनेकजण प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :रब्बीपीक कर्जशेतकरीबँक