राज्यात वीस-बावीस वर्षांमध्ये रब्बी ज्वारी व करडई या पिकांचे क्षेत्र कमी होऊन हरभरा, गहू व मका या व्यापारी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तर जलस्रोतांमध्ये वाढ झाल्याने हरभऱ्याच्या क्षेत्रात तब्बल २३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र, रब्बी ज्वारीचे क्षेत्र १९ लाख हेक्टरने घटले आहे.
ज्वारीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्यानेच क्षेत्र घटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तृणधान्यांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी शेतकऱ्यांना परवडत असल्यास त्याचे क्षेत्र वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने मात्र यंदा ज्वारीची पेरणी २० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
रब्बीच्या २२ वर्षांत पीकरचनेत झालेला बदल (क्षेत्र लाख हेक्टरमध्ये)
2000-01 | 2010-11 | 2022-23 | |
गहू | ७.५४ | १३.०७ | १२.१९ |
रब्बी ज्वारी | ३१.८४ | ३०.२८ | १३.२९ |
मका | ०.६२ | १.३८ | ४.२४ |
हरभरा | ६.७६ | १४.३८ | २९.५६ |
करडई | २.९६ | १.७३ | ०.३२ |
ज्वारीचे उत्पन्न परवडत नाही
■ रब्बी ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यांमध्ये आहे.
■ वीस वर्षांत छोटे तलाव, मध्यम प्रकल्प तसेच शेततळ्यांमधून पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी ज्वारीऐवजी आता ऊस पिकाकडे वळले.
■ ज्वारीचे उत्पन्न परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा कल गहू, हरभरा यासारख्या पिकांकडे आहे.
■ ज्वारीचे क्षेत्र घटण्यामागे मजुरांची उपलब्धता, पावसाचे असमान वितरण ही देखील स्थानिक कारणे आहेत.