विजय मुंडे
जालना : चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये झालेल्या कर वसुलीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी, घरपट्टीची तब्बल ७८ टक्के वसुली करण्यात आली आहे.
यात बदनापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सर्वाधिक ८७ टक्के कर वसुली केली आहे, तर जालना आणि परतूर तालुक्यातील ग्रामपंचायती कर वसुलीत मागे आहेत.
गावाच्या विकासासाठी अधिक निधी मिळावा यासाठी ग्रामपंचायतींनी कराची वसुली करणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतींकडून विविध सेवा ग्रामस्थांना पुरविल्या जात असून, घरपट्टी आणि नळपट्टीची वसुलीही केली जात आहे.
या कराच्या वसुलीवर ग्रामपंचायतीचे बरेचसे कामकाज अवलंबून असते. कराची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्यही नेहमीच विविध मार्गानी जनजागृती करतात. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी, सदस्यांचे पथक ग्रामस्थांकडे जाऊन प्रत्यक्ष कराची वसुली करते.
चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मागील थकबाकी १ कोटी ४८ लाख ३२ हजार, तर चालू मागणी १२ कोटी १२ लाख ११ हजार रुपये होती. अशा एकूण १३ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांच्या कराची वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींसमोर होते. त्यातील ७८ टक्के उद्दिष्ट ग्रामपंचायतींनी साध्य केले.
जालना तालुक्यात ६७ टक्के वसुली
* कर वसुलीत जालना व परतूर तालुक्यातील ग्रामपंचायती पिछाडीवर आहेत. जालना तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सरासरी ६७.०८ टक्के, तर परतूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ७७.१७ टक्के कराची वसुली केली.
* कर वसुलीत बदनापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आघाडी घेतली आहे. या तालुक्यातून एकूण १ कोटी ३ लाख ६६ हजार रुपये कर वसुली होणे अपेक्षित होते.
* यापैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी २० लाख ४६ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. याची सरासरी ८७.२६ टक्के आहे.योजनांचा लाभदेण्यासाठी प्रारंभी ग्रामपंचायतीचा थकीत कर भरावा, अशा सूचनाही पदाधिकारी, सदस्य देतात.
...अशी आहे कर वसुलीची टक्केवारी
तालुका | घरपट्टी | पाणीपट्टी |
जालना | ६७ | ६८ |
बदनापूर | ८७ | ७६ |
अंबड | ७९ | ७७ |
घनसावंगी | ८२ | ८४ |
परतूर | ७७ | ७९ |
मंठा | ७९ | ७८ |
भोकरदन | ८० | ८० |
जाफराबाद | ८३ | ८३ |
हे ही वाचा सविस्तर: Krushi salla : भाजीपाला पिकांसाठी सामान्य सल्ला वाचा सविस्तर