विजय सरवदे
गावांमध्ये विकास कामे राबविण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा तब्बल ५८ कोटी रुपयांचा बंधित व अबंधित निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाला आहे.
ऐन महालक्ष्मी सणातच हा निधी मिळाल्यामुळे 'लक्ष्मी पावली', अशी भावना ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील वित्त आयोगाचा हा पहिला हप्ता असून, त्यातील किमान ५० टक्के निधी ऑक्टोबर अखेरपर्यंत खर्च करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
मार्च २०२० पासून १४ व्या वित्त आयोगाचा कालावधी समाप्त झाला. त्यानंतर पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी एप्रिल २०२०-२१ ते मार्च २०२४-२५ १५ वा वित्त आयोग सुरू झाला. येणाऱ्या मार्चपासून या आयोगाचा कालावधीदेखील समाप्त होईल.
त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत ग्रामपंचायतींकडे शिल्लक असलेला १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. सध्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असल्यामुळे शासनाने या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना १५व्या वित्त आयोगाचा निधी दिलेला नाही.
तथापि, वितरित करण्यात आलेला बंधित निधी हा ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील स्वच्छतेचे प्रमाण वाढविणे तसेच पाणीटंचाई कमी करण्यासाठी जलपुनर्भरण, जलपुनर्प्रक्रिया या कामांसाठी खर्च करावा, तर अबंधित निधी विकास कामांसाठी वापरावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
असा मिळाला निधी
तालुका | ग्रा.पं. | बंधित निधी | अबंधित निधी |
छत्रपती संभाजीनगर | ११५ | ५,४३,५४,००० | ३,६२,५५,००० |
फुलंब्री | ७१ | ३४,८४,००० | १,५६,६४,००० |
सिल्लोड | १०४ | ४,७४,१४,००० | ३,१६,२६,००० |
सोयगाव | ४६ | १,६६,१४,००० | १,१०,८२,००० |
कन्नड | १३८ | ४,७१,८२,००० | ३,१४,७१,००० |
खुलताबाद | ४० | १,६०,२७,००० | १,०६,९०,००० |
गंगापूर | १११ | ५,१८,९५,००० | ३,४६,१५,००० |
वैजापूर | १३५ | ४,२६,५४,००० | २,८४,५१,००० |
पैठण | ११० | ४,८४,०९,००० | ३,२२,८९,००० |