छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील ग्रामपंचायतीने ठोक्याने केलेल्या ५ एकर शेतीत उत्पन्न वाढीसाठी शेवग्याची लागवड केली असून सध्या या शेवग्याला शेंगाचा बहर आला आहे.
जरंडी येथील ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसह उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामपंचायतीकडे ठोक्याने पाच एकर शेती केली असून या शेतात ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये ठिबक सिंचनावर शेवग्याची लागवड केली होती. या शेतीत विहीर आहे. तसेच यासाठी एका मजुराची नियुक्ती करण्यात आली आहे.
अद्रक उत्पादनातून शेतकऱ्यांनी कमावले ४५ कोटी; तांबेवाडी गावाचा राज्यासमोर आदर्श
फेब्रुवारी महिन्यात विहिरीतील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे ग्रा.पं.ने टँकरद्वारे पाणी आणून शेवग्याची शेती वाचवली. शेवग्याची व्यवस्थित देखभाल केल्यानंतर सध्या या शेवग्याला शेंगाचा बहर आला आहे.
या शेंगा जळगाव, पाचोरा येथील किरकोळ बाजारात विकून मिळालेल्या नफ्यातून गावाचा विकास करण्याचा निर्णय ग्रा.पं.ने घेतला आहे. आता ग्रा.पं.ला उत्पन्नही मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई पाटील, मधुकर पाटील, मधुकर सोनवणे यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ग्रामपंचायतीचा शेवग्याच्या शेतीचा उपक्रम यशस्वी केला आहे.