अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेतंर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे.
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजना सन २०२४-२५ या वर्षात बीज प्रक्रिया संच प्राप्त लक्षांकाच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्या नंतर संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहील.
सदरील पात्र शेतकरी उत्पादक कंपनी, संघ तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास पात्र राहतील. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अर्ज करताना ज्या कार्यक्षेत्रात कंपनी आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहीत प्रपत्रात अर्ज सादर करावा लागेल.
अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनी, संघाचे लेटरहेडवर अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कमिटी ठराव, मागील तीन वर्षांचा बॅलेन्स शिट किंवा ऑडिट रिपोर्ट, ज्या जागेवर बीज प्रक्रिया संच उभारणीचे नियोजन आहे त्या जागेचा सातबारा व आठ 'अ' चा उतारा जोडावा लागेल.
नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी त्यांच्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, कार्यालय येथे संपर्क करून बीज प्रक्रिया संच उभारणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे.
अर्ज करण्याचा दिनांक
शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे अर्ज ३१ जुलै २०२४ अखेर आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करू शकतील.
अंमलबजावणी प्रक्रिया
निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक कागद पत्राची छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर बीज प्रक्रिया संच उभारणीस कार्यारंभ आदेश दिला जाईल. निवड ते पूर्वसंमती व पूर्व संमती ते काम पूर्णत्व यासाठी ज्या आर्थिक वर्षात पूर्वसंमती देण्यात आलेली आहे त्याच आर्थिक वर्षात बीज प्रक्रिया संच प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.