संदीप मानेखानापूर: खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे.
या पावसामुळे द्राक्ष शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. द्राक्ष छाटण्या रखडल्या असून छाटणी झालेल्या द्राक्षबागा रोगामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
खानापूर घाटमाथ्यावर खानापूर, पळशी, हिवरे, बेनापूर, बलवडी (खा), सुलतानगादे, करंजे या गावांमध्ये निर्यातक्षम द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता द्राक्षबागा मोठ्या हिंमतीने फुलवल्या आहेत.
या द्राक्षबागांची छाटणी, औषध फवारणी, काडीची वांझ काढणे यासारखी सर्व कामे विशिष्ट अशा नियोजनानुसार केली जातात. द्राक्ष छाटणीपासून द्राक्ष काढणीपर्यंतची कोणते कामे कोणत्या दिवशी करायची याचे वेळापत्रक द्राक्ष बागायतदारांकडे तयार असते.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून व ऑक्टोबर महिन्यामध्ये खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्ष बागायतदार बागांची छाटणी घेतात.
मात्र यावर्षी या भागात पाऊस सुरु असल्याने दिवसभर कडक ऊन व रात्री मुसळधार पाऊस अशा परिस्थितीमुळे द्राक्ष बागायतदार पूर्णपणे हबकला आहे. या द्राक्ष बागांमध्ये पाणी साठून राहिल्याने द्राक्ष छाटणी पूर्वीची कामे रखडली आहेत.
ज्या बागांची छाटणी घेतलेली आहे, त्या बागामध्ये पाण्यामुळे व चिखलामुळे ट्रॅक्टर जात नसल्याने द्राक्ष बागायतदारांना गुडघाभर पाण्यातून औषध मारण्याची वेळ आली आहे. सतत औषध फवारणी करायला लागत असल्याने औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असून शेतकरी मेटाकुटीला आल्याचे सध्याचे चित्र आहे.
सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे द्राक्ष शेती पूर्णता संकटात सापडली असून यावर्षी औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. रखडलेल्या द्राक्ष छाटण्या ऑक्टोबर महिन्यात पाऊस उघडल्यानंतर घ्याव्या लागणार आहेत. याचा मोठा परिणाम द्राक्ष काढणीच्या वेळेला होणार आहे. - सचिन शिंदे, निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार, बेनापूर (ता. खानापूर)