पुणे : महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे आणि सांगलीमध्ये द्राक्ष दिन साजरा केला जाणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असून पंढरपूर येथील माई फार्मच्या वतीने पुण्यात आणि सांगतील यश द्राक्षनगरी फार्मर प्रोडुसर कंपनी तासगाव यांच्या वतीने सांगलीमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी द्राक्ष खावेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून माई फार्मच्या वतीने नाशिक येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक महिलाशेतकरी वर्षा बोरस्ते यांना द्राक्षलक्ष्मी हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
द्राक्षपीक हे लहरी पीक आहे. लहरी निसर्गाच्या विकोपामुळे द्राक्षाचे कधी नुकसान होईल त्याचा नेम नसतो. अशा वेळी द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा कुठेतरी एक दिवस असावा आणि यानिमित्ताने शेतकऱ्यांना चार पैसे हातात मिळावेल म्हणून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
कोण आहेत 'द्राक्षलक्ष्मी वर्षा बोरस्ते'?वर्षा बोरस्ते हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील महिला शेतकरी आहेत. १९९४ साली त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीचा आणि संसाराचा गाडा पुढे एकटीने हाकला. त्यांची १० एकर द्राक्ष बाग असून त्या वर्षाकाठी ४० ते ५० लाख रूपयांचा निव्वळ नफा या शेतीतून कमावतात. त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांच्या या कामामुळे पंढरपूर येथील माई फार्मच्या वतीने त्यांचा पुण्यात द्राक्षलक्ष्मी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.