सांगली : यंदाच्या प्रतिकूल द्राक्षांची निर्यात १८ हजार टनांवर परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील ९ हजार ६२७ शेतकऱ्यांनी २५ देशांत द्राक्षाची निर्यात केली आहे. या वर्षीचा द्राक्षाचा निर्यात हंगाम आटोपला असून, १८ हजार ७७१ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.
ही निर्यात गतवर्षीच्या तुलनेत ८३४ टनांनी अधिक आहे. निर्यात द्राक्षासाठी उत्पादन खर्चही जास्त आहे. जिल्ह्यातून गेल्या पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे; मात्र पाणीटंचाई आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका तसेच द्राक्षावर बदलत्या वातावरणामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.
यामुळे बागांचे नुकसान झाल्याने द्राक्ष निर्यातीला याचा फटका बसला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागा उत्तम साधल्या.
यंदा जिल्ह्यातील ९ हजार ६२७ द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली. या वर्षी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढाकार घेतला असून ३ हजार ९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दुबई आणि सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली आहे.
जानेवारीपासून द्राक्ष युरोपियन देशांत पोहोचण्यास सुरुवात झाली. निर्यातीची गती वाढली असली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाची निर्यात कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता.
मिरज तालुक्यातील पूर्व भाग हा दुष्काळी आहे. येथे पाण्याची वाणवा असतानाही येथील शेतकऱ्यांनी बागा फुलविल्या आहेत. त्यामुळे या भागातून सुद्धा निर्यातक्ष द्राक्षे निर्मित होत आहे.
द्राक्षांची निर्यात १८ हजार टनांवरयंदा युरोपियन देशांत ७७५ कंटेनर म्हणजे १० हजार ३४८ तर आखातीसह अन्य देशांत ५९३ कंटेनरमधून ४८२३ अशा एकूण १३६८ कंटेनरमधून १८ हजार ७७१ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. गतवर्षी युरोपियन देशात ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन तर आखाती देशात ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्षे निर्यात झाली होती.
या देशांत निर्यातऑस्ट्रिया, कॅनडा, चीन, क्रोएशिया, डेन्मार्क, जर्मनी, हाँगकाँग, आर्यलँड, इटली, कुवेत, मलेशिया, नेदरलँड, नॉर्वे, ओमान, कतार, रोमानिया, रशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्पेन, तैवान, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, युनायटेड किंगडम आदी देशात जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात होते.
यंदा द्राक्षाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने निर्यात नोंदणीस शेतकरी पुढे आले नाहीत. त्यामुळे निर्यात कमी होईल, असा अंदाज होता; पण शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन केल्याने निर्यात वाढली आहे. - प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात), सांगली