महेबूब बक्षी
लातूर जिल्ह्यातील औसा तालुका हा कमी पर्जन्यमानाचा आहे. अशा कठीण परिस्थितीवर मात करीत पाण्याचा काटकसरीने वापर करून तालुक्यातील किल्लारी परिसरातील शेतकरी द्राक्षबागा (Grape farms) फुलवीत आहेत. तालुक्यातून गेल्या वर्षी जवळपास १ हजार ५२० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यातून चांगले उत्पादनही मिळाले आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी परिसरातून तेरणा नदी वाहते. पर्जन्यमान कमी होत असले तरी तालुक्यातील किल्लारी, लामजना, बोरगाव (न.), भादा, येल्लोरी, औशासह जवळपास ३० गावांतील शेतकरीशेती उत्पादन वाढविण्यासाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा (technology) वापर करीत नवनवीन प्रयोग करीत असतात. तालुक्यात जवळपास १५१ हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.
विशेषतः गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सातत्याने द्राक्षांचे पीक घेतले जाते. मध्यंतरीच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वाढती मजुरी, दरात घसरण आणि रोगराईमुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा मोडल्या. पण, मागील दोन वर्षांत हळूहळू बदल झाला. गेल्या वर्षी शंभर कंटेनर द्राक्ष युरोपीय देशात निर्यात झाले. त्यास चांगला दर मिळाल्याने आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली आहे.
विविध जातींची द्राक्षे उपलब्ध
औसा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार थॉमसन, सरिता, डबल एस., मर्लो, क्लोन २ यासह अन्य जातींच्या द्राक्षांचे उत्पादन घेतात. जिल्ह्यातून निर्यात होणारी जवळपास ८० टक्के द्राक्षे औसा तालुक्यातील असतात.
सर्वाधिक दर युरोपीय देशांमध्ये...
येथील द्राक्षाला सर्वाधिक मागणी युरोपीय देशांमध्ये असते. त्यामुळे दरही अधिक मिळतो. गेल्या वर्षी १३४ शेतकऱ्यांनी नोंदणी करून द्राक्ष निर्यात केली होती. तसेच माणिक चमन व इतर जातीची द्राक्षे चीन, बांग्लादेश, सौदी अरेबियामध्ये निर्यात होतात. चांगले उत्पादन झाल्यास खर्च वजा जाता ५० टक्के नफा पदरी पडतो.
द्राक्ष उत्पादक म्हणतात....
निसर्गाचा लहरीपणा, वाढत्या महागाईने द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत. ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. केवळ आश्वासने देण्यात येऊ नयेत, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदार विनय देशपांडे व अनंत हांडे यांनी व्यक्त केली.
द्राक्ष शेती एक उत्तम पर्याय असून यातून प्रगती होऊ शकते. पण सध्या विविध अडचणी, संकटांमुळे बागायतदारांची गळचेपी होत आहे. मागील दोन वर्षात द्राक्ष शेतीला चांगले दिवस आले आहेत. गतवर्षी निर्यातही चांगली झाल्याचे शेतकरी संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
उत्पादनात औसा तालुका अग्रेसर...
राज्यातील नाशिक, सांगली येथे सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्र असले तरीही प्रति हेक्टरी जास्त उत्पादन काढण्यात औसा सर्वात पुढे आहे. संपूर्ण राज्यात लौकिक मिळविला आहे. येथील शेतकरी नेहमी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्याचा चांगला लाभ होतो. - विकास लटुरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी.