Nashik Grape Farming : द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे GA अर्थात जिब्रालिक ऍसिड (gibralic acid) हे बाजारात जास्तीच्या किंमतीने विक्री होत आहे. मात्र द्राक्ष बागायतदार संघामार्फत शेतकऱ्यांना परवडणारा आणि उच्च गुणवत्ता असलेला GA विक्री केला जात आहे. बाजारात मिळणाऱ्या सुट्ट्या आणि कमी प्रतीच्या GA मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून मागील वर्षी याच कारणामुळे दहा कोटींचा फटका बसल्याचे स्पष्ट मत संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केले.
नुकतीच द्राक्ष बागायतदार संघाची (Draksh Bagayatdar Sangh) द्राक्ष परिषद पार पडली. यावेळी द्राक्ष बागांचे अवेळी होणाऱ्या पावसापासून संरक्षण व उपाय योजना तसेच उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करणे, यावर चर्चा झाली. याचवेळी द्राक्ष उत्पादकांसाठी महत्वाचे असलेले जिब्रालिक ऍसिड यावर संघाने प्रकाश टाकत बाजारातील तफावत शेतकऱ्यांसमोर मांडली.
बाजारात वेगवगेळ्या प्रकारचे GA उपलब्ध असून वेगवगेळ्या किंमतीमध्ये आहेत. काही ठिकाणी सुट्टे, पॅकिंग नसलेले GA बाजारात असल्याने शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारे आहे. दुसरीकडे संघामार्फत तपासणी केलेले, उच्च गुणवत्ता असलेले, व्यवस्थित पॅकिंग केलेले GA उपलब्ध आहेत. शिवाय किंमतीही कमी असल्याने शेतकऱ्यांना परवडणारे असल्याचे भोसले यांनी नमूद केले.
ही तफावत पहाच..
मागील वर्षीचा नाशिक विभागाचा (Nashik District) मार्केटमधील GA विक्रीचा आढावा बघितला तर संघ वगळून इतर कंपन्यांचा ९० टक्के सोलवंट GA ची ७ हजार ५०० किलो व ईझी GA ७ हजार किलो विक्री झालेली होती. तर आपल्या संघाचा ९० टक्के वाला GA ८०० किलो व ईझी GA ५०० किलो अशी एकूण विक्री झाली. मार्केटमध्ये इझी GA च्या किमती १७ हजार ५००० प्रति किलोपर्यंत आहे. संघाच्या ईझी GA ची किमत १० हजार ८०० प्रति किलो आहे.
म्हणजे मार्केटमधून ७००० किलो ईझी GA घेतल्यामुळे ६ हजार २०० प्रति किलो फरका प्रमाणे ४ कोटी ३४ लाख रुपये अधिक मोजावे लागले. तर GA ९० टक्केच्या मार्केटमधील किमती व संघाच्या GA च्या किमतीमध्ये ३ हजार रुपयापासून ते १४ हजार रुपये प्रति किलो इतका आहे. याप्रमाणे बघितले तर मार्केटमधून ७५०० किलो ९० टक्के GA घेतल्यामुळे ६ कोटी २५ लाख रुपये जास्तीचे गेले. असे दोन्ही प्रकारचे GA मिळून एकूण १० कोटी ५० लाख रुपयांची जास्तीची जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागली.
शेतकऱ्यांमध्ये जागरूकतेची कमी
म्हणजेच द्राक्ष बागायतदार संघाच्या GA बाबत अद्यापही शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नसल्याचे हे ताजे उदाहरण आहे. द्राक्ष हंगाम सुरु झाल्यापासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक कृषी निविष्टा लागतात. त्यात शेतकऱ्याचे कोटी रुपये जातात. मग अशा पद्धतीने इतर कंपन्यांचा इझी GA वापरण्याऐवजी शेतकऱ्यांनी संघाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याची सोल्युबिलीटी कमी असून सर्वात चांगली आहे. प्रती किलोमागे मार्केटरेट पेक्षा रु.६ हजार २०० रुपये कमी आहे. यासाठी संघामार्फत तळेगाव वणी फार्म येथील द्राक्ष बागेवर संपूर्ण संघाचा GA व इतर संघाचे उत्पादने वापरले जातात. एकीकडे द्राक्ष शेती सध्या तोट्यात आहे, मात्र तळेगाव फार्म येथील द्राक्ष शेती दरवर्षीं दोन ते तीन लाख प्रती एकर याप्रमाणे नफ्यात असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे बाळासाहेब गडाख यांनी स्पष्ट केले.
द्राक्ष संघातर्फे आवाहन
शिवाय संघाच्या GA ची अधिकृतरीत्या लॅबद्वारे तपासणी केली जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना विक्री केली जाते. या सर्व बाबींचा विचार करून द्राक्ष बागाईतदार संघाने चालू वर्षात विद्राव्य खते, औषधे यांचे दर मोठ्या प्रमाणात कमी आहेत. शेतकऱ्यांसाठी सदर खते, औषधे संघाच्या ओझर, पिंपळगाव, निफाड, सटाणा, पांढूली या वितरण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच संघाची ओझर येथे आधुनिक व सुसज्ज अशी प्रयोगशाळा असून सभासद शेतकरी यांचे साठी नमुना तपासणी फी हि ५० टक्के कमी करून सेवा दिली जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जागरूक संघाचा GA वापरावा असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघातर्फे करण्यात आले आहे.