विष्णू वाकडे
द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेततळी रिकामीच राहिले आहेत. त्यामुळे आता द्राक्ष बाग शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे.
जालना तालुक्यातील द्राक्षबागेचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या आणि द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत ऑगस्ट महिना अखेरपर्यंत केवळ २७६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे परिसरातील ८० टक्के शेततळी आजही रिकामीच आहेत.
लोकसहभागातून कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पाणलोटामध्ये राज्यात नाव करणाऱ्या कडवंचीमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने भविष्यात या बागा वाचवायच्या कशा आणि बँकेची लाखो रुपयांची कर्जे फेडायची कशी, अशा विवंचनेत द्राक्ष उत्पादक आहेत.
वीस वर्षांपासून मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषिरत्न विजयआण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे, तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची गावात पाणलोट तसेच मृद व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न लाखो रुपयांनी वाढले खरे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या लाभाच्या योजनेसह स्वखर्चातून जवळपास ६५० पेक्षा जास्त शेततळे ३५० ते ४०० विहिरी खोदल्या आहेत. जवळपास ७५० ते ९०० हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आल्याचे कृषी विभागातील आकडेवारीवरून समजते.
ऑक्टोबरची बाग छाटणी द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची असते. छाटणीसाठी मुबलक पाण्याची असावे लागते. पाणीच नसले तर, पाणी साठवायचे कसे, हाच खरा प्रश्न द्राक्ष उत्पादकांसमोर आहे.
समाधानकारक पाऊस झाला नाही तर, कडवंचीसह परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. अर्थचक्र संपूर्ण कोलमडून जाणार असल्याचे येथील द्राक्ष उत्पादकांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही समाधानकारक पाऊसच पडला नाही. तर ठिबक सिंचनाचा वापर करायचा कसा ? शेततळे भरायचे कसे, अर्ध्याच्यावर पावसाळा संपला, परतीच्या पावसाच्या भरवशावरच आता सर्व काही अवलंबून आहे. - विक्रम क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, शेतकरी
सन २०१२ आणि २०१६ च्या दुष्काळानंतर कोरोनाचे संकट आले. त्यानंतर अतिवृष्टीचे संकट. आता परत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. समाधानकारक पाऊस पडला तरच यावर्षीचा हंगाम घेणे शक्य होणार आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर बागा जशास तशा राहतील. आकाशातील ढग पाहून पाऊस पडेल, असे वाटते.
मात्र दररोज निराशा होते. -प्रभाकरराव क्षीरसागर, शेतकरी