Join us

द्राक्ष हंगामास झाली सुरुवात, अनेक तरुणांचा ओढा बेदाणे उद्योगाकडे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 4:34 PM

स्पर्धा आणि जोखीमही : निफाड तालुक्यात वाढतोय व्यवसाय

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, भाजीपाला, ऊस शेती केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन असे अनेक व्यवसाय केले जातात. परंतु अलीकडे निफाड तालुक्यातील अनेक तरुण जोडधंदा म्हणून द्राक्षापासून बेदाणा बनवण्याचा उद्योग करू लागले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनीही या व्यवसायात आपले पाय रोवले आहेत. पण यंदा बेदाणे उत्पादनासाठी द्राक्ष कमी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने हा व्यवसाय जोखमीचा ठरण्याची शक्यताही शेतकरी व्यक्त करत आहेत. 

सध्या द्राक्ष हंगामास सुरुवात झाली असून बेदाणा व्यावसायिकांचीही बेदाणा निर्मितीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. त्यासाठी शेड उभारणीची लगबग मोठ्या प्रमाणावर सध्या दिसून येत आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासत असल्याने कामगारांच्या रोजगाराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निफाड तालुक्यात कसबेसुकेणा, दिक्षी, दात्याने, उगाव, शिवडी, पालखेड, लोणवडी, पिंपळगाव, ओझर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा शेडची उभारणी केली जाते. पिंपळगाव बाजार समितीत उत्पादित बेदाण्याची खरेदी-विक्री केली जाते.

द्राक्षाला भाव वाढला तर एक्सपोर्ट युनिटवर पॅकिंग वेळी व शेतकऱ्यांच्या शेतात काढणीच्यावेळी निघणाऱ्या मण्यांवर बेदाणा उत्पादकाना अवलंबून राहावे लागते. या व्यवसायात अनेक तरुण उतरल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अनेकदा बाजारभाव मिळत नसल्याने अनेक व्यावसायिक कर्जबाजारीसुद्धा होतात असेही बोलले जाते.- सचिन चौधरी, बेदाणा उत्पादक, दिक्षी

शेतकऱ्यांना बेदाण्याने दिली साथ; मिळतोय उच्चांकी बाजारभाव

बेदाणा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक शेड उभारणीसाठी बांबू, बारदाण, सुतळी, विविध केमिकल्स, व बेदाणा प्रक्रियांसाठी आवश्यक साधने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल उभे करावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यातच व्यावसायिक वाढल्याने स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे द्राक्ष खरेदी महाग बनली असून चढ्या भावाने द्राक्ष खरेदी करून बेदाण्याला बाजारभाव मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे हा व्यवसाय अलीकडे जोखमीचा झाला आहे. - होनाजी चौधरी, द्राक्ष उत्पादक, दिक्षी

यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष कमी पडण्याची शक्यता

यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष कमी पडू लागली आहेत. द्राक्षाला चांगले दर मिळू लागल्याने शेतकरी द्राक्ष विक्रीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे तीन महिने चालणारा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपेल. बेदाण्याचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटेल असा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :व्यवसायनाशिक