Pune : मान्सूनचा पाऊस शेवटच्या टप्प्यात असून राज्यभरातील द्राक्ष बागायतदार द्राक्ष छाटणीच्या कामात गुंतलेले आहेत. महाराष्ट्रातील सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची शेती केली जाते. तर सध्या शेतकऱ्यांची गोडी बहाराची किंवा ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजून छाटणीला सुरूवात केली नसून काही शेतकऱ्यांची छाटणी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, सांगली, नाशिकच्या तुलनेत बारामती परिसरातील शेतकऱ्यांचा माल प्रामुख्याने मार्केटमध्ये लवकर येतो. येथील द्राक्षाच्या छाटण्याही लवकर केल्या जातात. त्यामुळे हा माल लवकर बाजारात येत असल्यामुळे बारामतीच्या द्राक्षाला बाजारात चांगला दर मिळतो. पण यंदा बारामतीमधील केवळ २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या दरम्यान छाटण्या केल्या आहेत. त्यामुळे येथील केवळ २५ टक्के माल बाजारात लवकर येणार आहे.
वातावरण
बारामती तालुक्यातील बोरी, जंक्शन या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची शेती केली जाते. तर सांगली जिल्ह्याच्या तुलनेत तापमान कमी असते. त्यामुळे येथील द्राक्षाची प्रत चांगली असते. तर नाशिक भागात धुक्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये आव्हाने जास्त आहेत. तुलनेने बारामती परिसरातील हवामान आणि तापमान द्राक्ष शेतीला पूरक आहे.
छाटण्याला लेट का?
दरवर्षी लवकर छाटणी करून या परिसरातील शेतकरी बाजारामध्ये लवकर द्राक्षाचा पुरवठा करत होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही वर्षांमध्ये लवकर आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळाला नाही. म्हणून लवकर छाटणी करून नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यापेक्षा उशीरा छाटणी केलेली बरी अशा विचारातून अनेक शेतकऱ्यांनी उशिरा छाटणी केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
अवकाळीची भिती किती?
राज्यात अजून परतीच्या पावसाला सुरूवात झाली नसून येथील केवळ २५ टक्के शेतकऱ्यांच्या छाटण्या आत्तापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत द्राक्षाच्या टप्प्याटप्प्याने छाटण्या केल्या जातात. लवकर बहार धरल्यास धुके, परतीचा पाऊस, अवकाळीची जास्त भिती असते, ती भिती आता कमी शेतकऱ्यांना असणार आहे.
दरासंदर्भात संभ्रमता
बारातमीमधील बहुतांश शेतकरी द्राक्षाची निर्यात करतात. तर चीनमध्ये भारतातील ६० टक्के द्राक्ष निर्यात केली जातात. साधारण मागील तीन ते चार वर्षांपासून चीनमधील निर्यात कमी होताना दिसत आहे. चीन द्राक्षाऐवजी चेरी खाण्यास प्राधान्य देत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये होणारे निर्यात वाढले आणि मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना दरांवरून फटका बसला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाचाही समुद्रमार्गे होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवर फटका बसला आहे. यंदा द्राक्ष एकाच वेळी बाजारात येण्याची शक्यता असल्याने दरासंदर्भात संभ्रमता असल्याचंही उत्पादक सांगतात.
बोरी परिसरात उत्तम दर्जाचे द्राक्ष तयार होतात. तर यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान छाटणी केली आहे. त्यामुळे येथील मालही यंदा उशिरा म्हणजेच नाशिक, सांगली परिसरातील द्राक्षासोबतच बाजारात येणार आहे. सध्याच्या घडीला द्राक्ष शेतीसाठी हवामान चांगले आहे.
- अजित शिंदे (द्राक्ष उत्पादक शेतकरी, बोरी, ता. बारामती)