Grapes Farming :
नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्याला बंपर द्राक्ष उत्पादन हंगामाची अपेक्षा आहे. देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असून, नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे.
यंदा जिल्ह्यात दीड लाख क्षेत्रावर नियमित द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. सटाणा, बागलाणमध्ये द्राक्षांची छाटणी सुरू झाली असली, तरी पावसामुळे निफाड, दिंडोरी, सिन्नर, येवला तालुक्यात द्राक्षांच्या छाटणीस ब्रेक लागला होता.
मात्र, रविवारी (दि. २९) पावसाचा जोर ओसरल्याने छाटणी सुरू झाली. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर द्राक्ष छाटणीस येथे अधिक वेग येईल. नाशिकमधून द्राक्षाचा पहिला कंटेनर रशियासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रवाना होईल.
अर्ली द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक महत्वाचा असतो. निफाड, दिंडोरी आणि नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील ९१ टक्के द्राक्षनिर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असून, या वर्षी द्राक्षबागा चांगल्या स्थितीत आहेत.
द्राक्ष उत्पादकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या म्हणण्यानुसार, हवामानाची परिस्थिती समाधानकारक राहिल्यास जिल्ह्यातील उत्पादन यंदा २० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते.
गेल्या हंगामात, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे ३० टक्के काढणीसाठी तयार द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम होऊन काढणी केवळ १२ लाख टन एवढीच झाली होती, मात्र यंदाच्या हंगामात ही पोकळी भरून निघण्याची आशा आहे. युरोपात जानेवारीपासून द्राक्षांचे कंटेनर रवाना होतील. द्राक्ष निर्यातदारांसाठी पिंपळनेरला ३ ऑक्टोबरला चर्चासत्र आयोजिले आहे.
यंदा काड्या अधिक परिपक्व■ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक रामनाथ शिंदे यांच्या मते यंदा दाक्ष बागांवरील काड्या अधिक परिपक्व झाल्या आहेत.
■ हंगाम चांगला येण्याची आशा यामुळे नैसर्गिकरीत्या अधिक बळावते. त्यामुळे द्राक्ष बागायत- दारांमध्ये समाधान आहे.
■ मागील वर्षी अनेक संकटे अंगावर घेण्याची नामुष्की द्राक्ष उत्पादकांवर आली होती.
या देशांमध्ये जाणार द्राक्ष
■ युरोप खंडातील नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, यूके आणि डेन्मार्क हे द्राक्षांची आयात करणारे मुख्य देश आहेत. प्लॉट बुकिंगच्या माध्यमातून निर्यातदार विदेशात द्राक्षमाल पाठवतील.
■ युरोप वगळता रशिया, यूएई, कॅनडा, तुर्की आणि चीन या देशांतून द्राक्षांना मोठी मागणी असून, येथेही मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात यंदा देखील केली जाणार असल्याचे द्राक्ष निर्यात- दारांनी सांगितले.
सागरी प्रवास महागण्याची शक्यता
■ सध्या सुरू असलेल्या इस्रायल आणि हिज्बुल्लाह युद्धामुळे सर्वच देशांची चिंता वाढली आहे. इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये संघर्ष वाढतच आहे. युद्ध थांबले नाही, तर यंदाही नाशिकसह राज्यातून युरोपात निर्यात होणाऱ्या द्राक्षांचा प्रवास अफ्रिका खंडातून लांबचा म्हणजे ४२ दिवसांचा होऊ शकतो.
■ सुवेझ कालव्यातून नेहमीप्रमाणे द्राक्ष युरोपात जातात. सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो, ज्यामुळे तो युरोपमधून आशियापर्यंतचा सर्वात लहान सागरी मार्ग आहे.
■ बांगलादेशने प्रति किलो द्राक्षांसाठी लागू केलेले १०० रुपये आयात शुल्क याचाही विपरीत परिणाम द्राक्ष निर्यातीवर होण्याचा अंदाज आहे.