Join us

खानगाव बाजारातील हिरव्या मिरचीचा परदेशात तडका; लासलगाव बाजार समितीमार्फत होते निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:03 PM

कांदा पिकाची जागतिक बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीचे खानगावनजीक उपआवार आता मिरची पिकांचेही मोठे डेस्टिनेशन ठरत आहे.

शेखर देसाई

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती मार्फत लिलाव झाल्यानंतर ठसकेबाज लवंगी मिरची, साधी मिरची आणि उपहारगृहात अत्यावश्यक झालेली ढोबळी मिरची, शेडनेट मधील पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारी लाल-पिवळी, हिरवी ढोबळी मिरची असे अनेक मिरचीचे बहुविध प्रकार आता लासलगाव मार्गे जगात पोहोचले जात आहेत. कांदा पिकाची जागतिक बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीचे खानगावनजीक उपआवार आता मिरची पिकांचेही मोठे डेस्टिनेशन ठरत आहे.

लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेले खानगाव येथे २०२० पासून येथे भाजीपाला लिलावाला सुरुवात झाली. सुरुवातीला २०२०-२१ ला हिरव्या मिरचीची आवक ३९ हजार ६२३ क्विंटल आवक होऊन त्या माध्यमातून १० कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल झाली असून २०२३- २४ मध्ये ५३,१३१ क्विंटल आवक होऊन या माध्यमातून १४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.

दोन वर्षाच्या तुलनेत सदर उलाढाल ही साडे तीन कोटी रुपयांनी वाढ झालेली दिसून येते. चालू हंगामात मे ते जुलै २०२४ मध्ये हिरव्या मिरचीला सरासरी भाव ३८०० रुपये क्विंटल मिळाला आहे तर दि २२ ऑगस्ट २०२४ ला २३ हजार बॅगची विक्रमी आवक झाली होती. १० सप्टेंबर २०२४ ला या मोसमात हिव्या मिरचीला ५१०० क्विंटल सर्वात जास्त दर मिळाला.

या उपबाजार आवारात प्रामुख्याने भाजीपाला हिरव्या मिरचीसह निफाड व चांदवड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर येतो तर नांदगाव, येवला, वैजापूर, तालुक्यातून थोड्याफार प्रमाणात आवक येत असते. खानगाव उपबाजार आवारात हिरव्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते त्यात प्रामुख्याने हिरवी मिरची, सिमला मिरची पिकेडोर, बलराम, ज्वाला, ज्वेलरी, सितारा हे पान या बाजार समितीत विक्रीसाठी येत असतात.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खानगाव नजीक उपआवार द्राक्षमणी बरोबरच आता मिरची या पिकाला चांगला भाव मिळत आहे. परिसरात उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. अधिकाधिक सुविधा देण्याचा बाजार समितीने नेहमीच प्रयत्न केला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी आवकदेखील वाढलेले आहे - नरेंद्र वाढवणे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव.

खानगाव बाजार आवारात हिरव्या मिरचीचे आवक चांगली आहे. येथील मिरची लंडन, कतार, ओमन, दुबई, जर्मनी येथे साडेचार किलो बॉक्स पॅकिंगच्या स्वरूपात पाठवला जातो. - विजय घोरपडे, जी.के. ऍग्रो एक्सपोर्ट खानगाव.

हेही वाचा - Sericulture Success Story : रेशीम शेतीची माधवरावांना मिळाली साथ; अल्पभूधारक शेती उत्पन्नाला दिली आधुनिक वाट

टॅग्स :मिरचीशेती क्षेत्रशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिक