Ground Water Level :
जालना : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात भूजल पातळीत ३.५० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ १.११ टक्के एवढी असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जालना जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. मागील वर्षी एकूण पडणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या फक्त ७४ टक्के पावसाची नोंद झाली होती.
कमी पावसामुळे धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली होती. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष जिल्ह्यात जाणवले.
जिल्ह्यातील ११० निरीक्षण विहिरीची तपासणी
१. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे अशा वर्षातून चारवेळा भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात.
पावसाळा संपत असताना सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या नोंदीवर जिल्ह्यातील, तालुक्यांतील टंचाईचे स्वरूप निश्चित केले जाते.
२. जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ११० निरीक्षण विहिरींद्वारे भूजल पातळी मोजली जाते. यावर्षी ७४ विहिरींमध्ये पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले, तर ३६ विहिरींमध्ये वाढ दिसून आली नाही.
३. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळीत १.११ मीटर इतकी वाढ झाली आहे. ही पातळी जमिनीच्या पृष्ठभागापासून मोजली जाते. त्यामुळे जितके अंतर कमी तितकी भूजल पातळीत वाढ हे सूत्र आहे.
पावसाने सरासरी ओलांडली
• जिल्ह्यात यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६०३ मिलीमीटर एवढी आहे.
• यंदा ८१२ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे १३२ टक्के जास्त नोंद झालेली आहे.
• पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे भूजलाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून आले होते.
• २०२३ मध्ये जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले होते. यात मागील पाच वर्षाच्या सरासरी मध्ये सुमारे ०.६९ टक्क्यांनी घट झाल्याचे दर्शविण्यात आले होते.