Groundnut cultivation : राज्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने सिंचनाची पिके (Crop) घेण्याला शेतकरी पसंती देत आहेत. शेंगदाण्याचा वाढलेला भाव पाहता अनेक शेतकरी भुईमूग लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाने १५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी उरकून घेण्याचे आवाहन केले आहे.
भुईमूग हे तेलबिया वर्गीय पिकामध्ये एक महत्त्वाचे पीक आहे. मात्र, सध्या शेंगदाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या किराणा मालाच्या यादीतून शेंगदाणा वगळला जात आहे.
बाजारात शेंगदाण्याला असलेला दर पाहता अनेक शेतकरी आता भुईमूग पिकाकडे वळले आहेत. भुईमुगाचा पेरा वाढला आहे. भुईमूग कमी कालावधीत भरघोस उत्पादन व पैसा देणारे पीक आहे. काही वाण तीन ते चार महिन्यांत तर काही वाण चार ते सहा महिन्यांत काढणीला येते.
भुईमूग व शेंगदाणाचे दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मार्केटमध्ये दरदेखील चांगला मिळत असतांना शेतकऱ्यांचा कल मात्र मात्र गळीत धान्याकडे नाही. त्यामुळे दरवर्षी क्षेत्रात घट होत आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण व योजना राबविण्याची गरज आहे.
शेंगदाण्याला आहारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. विविध खाद्यपदार्थात शेंगदाण्याचा वापर केल्या जातो. शिवाय उपवासाचे खाद्यपदार्थ तर शेंगदाण्याशिवाय होत नाहीत. शिवाय अनेक कुटुंबात शेंगदाण्याचे तेलाचा वापर होतो. शेंगदाण्याची ढेप पशुखाद्य म्हणून वापरल्या जाते.
शेंगदाणे व भुईमूगाला मोठी मागणी आहे. त्यातुलनेत शेतकरी मात्र भुईमुगाची पेरणी करत नाही. रानडुक्कर, रोही, हरिणासह अन्य वन्यप्राचा त्रास व वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी भुईमूगाचे पेरणी टाळत आहे.
पेरणी करताना घ्या काळजी
पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलवून नंतर वाफशावर पेरणी करावी.
तिन्ही हंगामातले पीक
भुईमुगाचे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेता येते. अल्प कालावधीचे पीक असल्याने भुईमूगाचे क्षेत्र रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी अन्य पिकाची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येते. हे क्षेत्र वढण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
मावा, बुरशी अळीची धास्ती
भुईमूगाचे पानावर टिक्का रोग येतो. बुरशीच्या प्रादुर्भावामूळे पिकाचे नुकसान होते. दरवर्षीच जिल्ह्यात या रोगाची लागण होते.
मानसाचाही उपद्रव
वन्यप्राण्यांचा भुईमूगाला त्रास हा मोठा फटका आहे. शिवाय अनेकजण खाण्यासाठी झाडे उपटतात. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते.
कमी कालावधीचे पीक
सोयाबीन, मूग, उडीदनंतर भुईमूग हे अल्प कालावधीत घेता येणारे पीक आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी असतो. असे कृषी विभागाने सांगितले खरिपामध्ये भुईमूगाची उत्पादकता चांगली राहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी
भुईमूग पेरणीसाठी जमीन मध्यम, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण योग्य असलेली असावी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी.
भुईमूगावरील कीड, रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.- राहुल सातपूते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी