अमुक शेतकऱ्याने कोथिंबीरीची लागवड केली होती आणि त्यास पितृपक्ष पंधरवाड्यात चांगला दर मिळाला. आगाऊ टोमॅटोची लागवड केली तर दर मिळतो. कांदा साठवून ठेवला आणि टंचाईत विक्री केला तर त्यास चांगला भाव मिळतो, उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवते, ज्यामुळे भाजीपाल्याचे दर खूप तेजीत असतात. असे अनेक उदाहरणे आपल्या समोर असतात मात्र पाणी टंचाई कधी-कधी आर्थिक अडचणी, मनुष्यबळ, आदी कारणास्तव शेतकरी मागे राहतो. या प्रश्नांना उत्तर हे गटशेती होऊ शकतं.
सततची नापिकी, दुष्काळ, ओला दुष्काळ, उत्पन्न कमी मिळणे, पिकांस दर न मिळणे, आदी आदी कारणांस्तव शेतकरी हवालदिल झालेला बघावयास मिळतो. यावर आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी गटशेती करण्याकडे वळणे काळाची गरज भासत आहे. बदलत्या काळानुसार कुटुंबपद्धती बदलल्या दहा वीस जणांचं कुटुंब आता अवघ्या दोन चार लोकांवर स्थायिक झालं आणि या सर्वांत जमिनींचे तुकडे झाले परिणामी या तुकड्यांच्या शेतीचे वाद उदयास आले भावबांधकीच्या कचाट्यात आपले लोकचं आपल्या माणसांचे हितशत्रू झाले.
भावकीमुळे शेतीच्या बांधावरून कोर्ट आणि पोलीस ठाण्याच्या चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांनी वकिलांचे खिसे भरता भरता स्वतःचे खिसे मोकळे केले. मात्र निर्णय काही झाले नाही किंवा या वेळी खाऊ प्रक्रियेमध्ये काही शेतकरी जीवाला मुकले आणि एकमेकांचे वैरी झालेले हे कुटुंब आजहि असेच भांडणात अडकून राहिलेले दिसून येतात.
पण आता येणाऱ्या अडचणी समजून घेत नसलेले वाद वर न काढता एकमेकांना सोबत घेऊन एकाच शेतात अनेक पिके घेण्याऐवजी शेतीचे आता आधुनिकतेच्या युगात अनेक तुकडे एकत्र करत त्या द्वारे एक किंवा विभाजून पिके घेतली तर उत्पन्न वाढेल, यांत्रिकीकरणांचा वापर करता येईल परिणामी मजुरांनावर होणार अवाढव्य खर्च वाचेल,भाव नसल्यास साठवण करता येते. किंबहुना त्या पिकांवर फळांवर प्रक्रिया उद्योगाद्वारे प्रक्रिया करून त्यास दर मिळवता येतो.
शेतकरी गट, प्रक्रिया उद्योग, यासाठी नाबार्ड, बँकेच्या अर्थसहाय्याने किंवा सरकार यांच्या वतीने बरेच उपक्रम सध्या सुरू आहे. याचा फायदा घेऊन प्रत्यक्षात हे सर्व अंमलात आणून गटशेती सोबतचं प्रक्रिया उद्योग सुरु झाले तर नक्कीच यातून शेतकरी आर्थिक बाजूने सक्षम होण्यास मदत होईल.
एकत्रीकरण केल्याने सर्वांच्या मदतीने मोठे शेततळे उभारले जाऊ शकते. ज्याद्वारे साठवलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात केला जाऊ शकतो. अशा आपआपसातील वाद बाजूला सारत शेतकऱ्यांनी आपला एकोपा दाखवत नियोजनबद्ध गटशेती केली तर शेती आणि मातीचा हा धारकरी कधीचं उपासमारीवर येणार नाही हे मात्र निश्चित.
- रविंद्र जाधव शिऊरकर