जनावरांना पौष्टिक आहार मिळण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या चाऱ्याचा वापर करतात. दुभत्या जनावरांचे दूध वाढण्यासाठी किंवा जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा असतो. अॅझोला, धान्य भरडून देणे, मुरघास, ओला चारा, सुका चारा, धान्य, जीनवसत्त्वे असलेला चारा अशा प्रकारचा चारा जनावरांना खाण्यासाठी वापरला जातो. पण हायड्रोपोनिक पद्धतीने वापलेला चारासुद्धा जनावरांना फायद्याचा ठरतो.
दरम्यान, हायड्रोपोनिक चारा कमी जागेत आणि कमी वेळेत उगवला जातो. त्याचबरोबर याचे फायदे जनावरांना अधिक असून त्याचा खर्चही कमीच असतो. त्यामुळे दुभत्या आणि इतर जनावरांसाठीसुद्धा हा चारा फायद्याचा ठरतो. केवळ पाच बाय दहा फुटांच्या जागेत आपण आठ ते दहा जनावरांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करू शकतो.
हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे
हायड्रोपोनिक चारा हा केवळ पाण्यावर येतो. या पद्धतीने वाढवलेला कोवळा चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांना प्रथिने आणि फायबरची पुर्तता होते. त्याचबरोबर दुभत्या जनावरांना हा चारा दिल्यानंतर दुधात वाढ होते. फायबर आणि प्रोटीनची पुर्तता झाल्यामुळे जनावरांच्या शेणातून वास येत नाही.
हायड्रोपोनिक पद्धतीने चारा कसा तयार करतात?
हायड्रोपोनिक चारा हा मातीविरहीत चारा असतो. प्लास्टिकच्या ट्रेमध्ये वाढवला जातो. मक्याचा चारा तयार करायचा असल्यास मका एक दिवस भिजवून दोन दिवस मोड येण्यासाठी बांधून ठेवावी लागते. मोड आल्यानंतर मका ट्रेमध्ये व्यवस्थित टाकावी आणि त्यानंतर दिवसभर वेळोवेळी फॉगरच्या साहाय्याने पाणी द्यावे. मका ट्रेमध्ये टाकल्यानंतर साधारण ७ ते ९ दिवसांत मक्याचा हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवलेला चारा जनावरांना खाण्यासाठी तयार होते.