आयुब मुल्ला
खोची : लोकांच्या आरोग्याबरोबरच शेतजमिनीचे आरोग्यही उत्तम राहावे, यासाठी सेंद्रिय भाजीपाला उत्पादन ही गरज बनली आहे. यासाठी सेंद्रिय भाजीपाला शेतकऱ्यांनी पिकवावा, या शेतीचे क्षेत्र वाढावे, यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. ५० टक्के अनुदान देणारी ही योजना लोकप्रिय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. स्वनिधीतून २९ लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.
या योजनेत चार बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यात हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांत भाजीपाला पिकाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वाधिक आर्थिक उद्दिष्ट या दोन तालुक्यांना देण्यात आले आहे. कमी कालावधीत रासायनिक खतांचा वारेमाप वापर करून भाजीपाला पिकविण्याची प्रचंड स्पर्धा वाढली आहे. कीटकनाशकांची फवारणी तर भयानक पद्धतीने केली जात आहे. यात भाजीपाला टवटवीत वजनदार उत्पादित होतो; परंतु त्याचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. कर्करोग, किडनी, पचनसंस्था, दृष्टिदोष विकार वाढत चालले आहेत. अभ्यासाअंती यावर उपाय हा सेंद्रिय भाजीपाला मानला जात आहे.
या दृष्टिकोनातून ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कीटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला असे त्याचे स्वरूप आहे. त्यासाठी सुचविलेले किट वापरायचे आहेत. टोमॅटो, कोबी, वेलवर्गीय काकडी, दोडका, कारली भाजीपाला, तसेच मिरची यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक भाजीपाल्यासाठी विविध घटक असलेली किट आहेत. अशा प्रकारची किट शेतकऱ्यांनी विकत घ्यावयाची आहेत. त्याचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
योजनेचे सुक्ष्म नियोजन
या योजनेत कोळपा व व्हर्मी कंपोस्ट बेड या दोन बाबींचा अधिकचा समावेश केला आहे. चालू वर्षी चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे; परंतु दुष्काळसदृश स्थिती अनेक तालुक्यातील मंडळात जाहीर केली आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. अशा स्थितीत ही योजना गतिमान होताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेंद्रिय भाजीपाला सुदृढ आरोग्यासाठी गरजेचा आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करावा, कृषी विभाग यासाठी मार्गदर्शन करणार असून, अनुदान देणार आहे. - अभयकुमार चव्हाण, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद