कांद्याच्या भावात सतत चढउतार होत असतातना आता रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडीच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अनेकजण आहारात कांद्याचा वापर करतात. त्यामुळे वर्षभर कांद्याला बाजारपेठेत मागणी असते. काही महिन्यापासून कांद्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात कांद्याची लागवड केली जाते. आता रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकरी तयारीला लागले आहेत.
शेतकरी कांदा रोपवाटिकेच्या तयारीला लागला
कांदा लागवडीसाठी रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी शक्यतो गादी वाफा १ मी. रुंद व ३ मी. लांब तसेच १५ सेमी उंच गादी वाफे तयार करण्याला शेतकरी पसंती देतात. सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकरी कांदा रोपवाटिकेच्या तयारीला लागला आहे..
कांद्याचे क्षेत्र वाढणार !
जिल्ह्यात ऐन काढणीच्या वेळी कांद्याचे दर गडगडतात; मात्र काही महिन्यांपासून कांद्याचे वाढलेले दर पाहता यंदा कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कांदा बी ४०० ते १६०० रुपये
रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकरी कांदा बी खरेदीसाठी बाजारात येत आहेत. सध्या कांदा बी ४०० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत प्रति किलो दराने विक्री होत असल्याचे हिंगोली जिल्हा पेस्टिसाईडस अॅण्ड फर्टिलायझर डीलर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद निलावार यांनी सांगितले.
कांदा उत्पादक शेतकरी म्हणतात......
शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की अचानक भाव गडगडतात. शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी सुविधा नसल्याने नाईलाजाने कमी भावात कांदा विक्री करावा लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.
जिल्ह्यात अनेक शेतकरी कांदा पीक घेतात. यंदाही कांद्याची लागवड करणार असून सध्या त्यासाठी शेतीची मशागत सुरु असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.
कांदा लागवडीबाबत काय काळजी घ्याल ?
कांद्याची रोपे गादी वाफे तयार करण्यासाठीच्या जमिनीची योग्य मशागत करावी. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे. बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारण्या कराव्यात. रोपे काढण्यापूर्वी २४ तास आगोदर यादी वाफ्यास पुरेसे पाणी द्यावे.