रविंद्र शिऊरकर
कमी चारा आणि कमी जागेत हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन.शेळीपालनाला फार कमी खर्च लागतो. मात्र यातून मोठा नफा मिळतो. तसेच हा व्यवसायासा व्यवस्थित नियोजनाने करणे आवश्यक असते.
अलीकडे शेळीपाळण हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. काही ठराविक जातीच्या शेळ्या दिवसाकाठी दोन ते अडीच लिटर दूध देतात. तसेच मांस करिता बोकडची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे आता शेळीपालन व्यवसायात व्यापारी वर्ग देखील येत आहे. मात्र दिवसेंदिवस मांस मागणी वाढत असल्याने आणि सोबत बोकड विक्री करिता तयार होण्यासाठी लागणारा काळ बघता, शेळीपालनात मोठ्या अनेक संधी दिसून येत आहे.
शेळ्यांच्या विविध जाती
आपल्याकडील सानेन, जमनापारी, बिटल, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट बोअर सारख्या विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते १२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. पर्यंत होऊ शकते.
आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत. तसेच बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते.
हेही वाचा - दूध व्यवसायात करायची आहे प्रगती; मग हे विसरून चालणार नाही!
या प्रकारे करू शकता शेळीपालन
१. परंपरागत पद्धत - परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो जो दिवसभर शेळयांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना चारून संध्याकाळी घरी आणतो. या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. मात्र या पद्धतीने अधिक प्रमाणात शेळ्या पाळता येत नाहीत. तसेच सुशिक्षित शेतकर्याला शेळी पालनाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर करावयाचा असल्यास त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही.
२. अर्धबंदिस्त पद्धत - या पद्धतीत शेळयांना वेळेनुसार चरण्यास सोडले जाते. अन्यथा एकाच जागी चारा पाणी दिला जातो. ही पद्धतीत काही अंशी परंपरागत शेळीपालन आणि बंदिस्त शेळीपालन यांचे मिश्रण आहे.
३. बंदिस्त पद्धत - यात जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.
शेळीचे काय आहेत इतर फायदे?
शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण फक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी शेळीची कातडी वापरली जाते. तसेच हाडांचा उपयोग खत म्हणून केला जातो.
शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो, परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा माणूस नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात.
शेळीपालनात किती संधी आहे ?
शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे. शेतकर्यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते. भविष्यात मांसची मागणी देखील अधिक असणार आहे. तसेच शेळी ही शेतकरी बांधवांसाठी ए टी एम असल्याने आपत्कालीन स्थितीत ते शेळी विकून पैसे करून घेऊ शकतात. शेळीला वर्षभर मागणी आहे.