Pune : पुणे मार्केट यार्डात तैवान पिंक पेरूला केवळ १० ते १२ रूपयांचा दर मिळत आहे. मागील एका महिन्यापासून पेरूचे दर कमी व्हायला सुरूवात झाली होती. आज हेच दर १० रूपयांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यातील पेरू उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर येणाऱ्या काळात पेरूचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने आणि बाजारात वाढलेल्या आवकेमुळे राज्यातील विविध जातींच्या पेरूला कमी दर मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील तैवान पिंक पेरूच्या लागवडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ७० ते १०० रूपये दर मिळण्याच्या अपेक्षेने लावलेली बाग शेतकऱ्यांना कवडीमोल दरामध्ये विकावी लागत आहे.
पेरूच्या तैवान पिंक, व्हीएनआर, रेड डायमंड, लखनऊ, सरदार या वाणाची लागवड राज्यात आहे. त्यातील रेड डायमंडला ३५ ते ४० रूपये किलो तर व्हीएनआरला २५ ते ३० रूपये किलोंचा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. अनेक व्यापाऱ्यांनी पेरू विक्रीसाठी बाजारात आणू नका असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
लागवडी वाढल्याकोरोनानंतर राज्यातील तैवान पिंक आणि इतर जातीच्या पेरूच्या लागवडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका एकरातून १० लाख रूपयांचे उत्पन्न होईल अशा पद्धतीने मार्केटिंग केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फटका सहन करावा लागत आहे. येणाऱ्या काळात पेरू लागवड करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांनी बाजारभाव आणि मागणी याचा विचार करूनच लागवड करणे योग्य राहील.