Join us

पशुवैद्यकीय क्षेत्रातील विकास आणि संशोधनासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:07 PM

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या सर्व गौरवार्थींकडून ग्रामीण विकासाची नाळ असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्राचा पाया सक्षम करण्याची प्रेरणा समाजाला मिळणार आहे.

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या सर्व गौरवार्थींकडून ग्रामीण विकासाची नाळ असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्राचा पाया सक्षम करण्याची प्रेरणा समाजाला मिळणार असून या क्षेत्रातील विकास आणि संशोधनासाठी राज्यातील सर्व ज्येष्ठ पशुवैद्यकांकडून विकास आणि संशोधनासाठी सातत्याने मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

पुणे येथील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १६/६/२०२४ रोजी पार पडलेल्या वार्षिक समारंभात दुरस्थ प्रणालीद्वारे त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार राज्यसभा सदस्य, पुणे यांच्या हस्ते विविध गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पशुसंवर्धन संचालनालयाच्या कामधेनु सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पशुवैद्यक आणि पशुपालकांचा सन्मान ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रविंद्र वझरकर आणि प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी अमेरिका स्थित प्रख्यात श्वान आहार तज्ञ डॉ. अविनाश देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानच्या "चारा आणि पशुखाद्य" या विशेषांकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी विशेषांक उपलब्ध करण्यात आला आहे.

पुरस्कारार्थींच्या कार्याचे गौरवपूर्ण शब्दात वर्णन करताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पशुवर्धक क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान वापरण्याची गरज प्रतिपादन केली. प्रतिष्ठानच्या रचनात्मक कार्यासाठी सदैव मदतीसह पुण्यात कायमस्वरूपी कार्यालय उभारणीचे त्यांच्याकडून आश्वासनही देण्यात आले. डॉ. वझरकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा सादर करून भविष्यातील योजनांची माहिती दिली. 

विविध पुरस्कार प्रायोजक आणि नामांकित व्यंकटेश्वरा हॅचरीचे डॉ. मोदे, खाजगी सेवा प्रदान करणारे पशुवैद्यक आणि जेष्ठ पशुवैद्य यांची या कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. धर्मा चव्हाण आणि सहसचिव डॉ. श्याम कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्यंकटराव घोरपडे आणि आभार प्रदर्शन सचिव डॉ. सुनील राऊतमारे यांनी केले. 

विविध पुरस्कारार्थी१) डॉ. अरुण दत्तात्रय गोडबोले यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांनी केलेल्या उत्कृष्ट संख्यांची पडताळणीतून सिद्ध वळुंच्या निवडीसह विभागाच्या संख्यांकी पृथक्करणातील उपयुक्त शिफारसींसाठी प्रदान करण्यात आला.२) आदिवासी भागात स्पृहणीय समाजसेवा करणारे आदर्श पशुवैद्यक डॉ. संतोष उमाजी शिंदे यांना उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्काराने गौरवण्यात आले.३) परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयातील जीव रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्राणेश विठ्ठलराव येवतीकर यांच्या अध्यापकीय गुणांचा सन्मान डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट अध्यापक संशोधक पुरस्काराने झाला.४) महिला पशुवैद्यक आणि ग्रामीण स्तरावर उत्कृष्ट शल्यचिकित्सा प्रदान करणाऱ्या डॉ. चैत्राली अशोक आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले.५) पशुपालन क्षेत्रातील अद्वितीय कार्यासाठी देशी गोवंश पैदासकार कुंदन बाळकृष्ण देशमुख, औरंगाबाद; उत्कृष्ट कुक्कुटपालक वैभव अरुण पवार, नाशिक; उत्कृष्ट शेळीपालक शैला विनायक नरवडे, पुणे; तर उत्कृष्ट मेषपालक सोमनाथ शंकर जाधव-माळी, सांगली यांना मान्यवरांच्या हस्ते रू. ५०००/-, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व  श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :शेतकरीगायडॉक्टरदुग्धव्यवसायशेतीपुणे