"सामुदायिक व एकात्मिक पध्दतीने शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन करावे तसेच खरीप पूर्व व नंतर अश्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन त्यामधे मिठाच्या द्रवणाचा उपयोग केल्यास कमी खर्चात बंदोबस्त होतो व शेवटी गरज भासल्यास रासायनिक पद्धतीचा काळजीपूर्वक वापर करावा असे" प्रा. अजयकुमार सुगावे, कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर, हिंगोली यांनी सांगितले
दिनांक २५ जुलै २०२३ रोजी मौजे नवखा तालुका कलमनुरी, जि हिंगोली या गांवामध्ये गोगलगाय या किडीचा प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आले. कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी श्री. माधव खंदारे व कृषी साय्यक श्री. निखील राठोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन प्रा. अजयकुमार सुगावे,विषय विषज्ञ, (किटकशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर, हिंगोली यांनी शेतकऱ्यांना गोगलगाई या किडीचा प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन या विषयावर सखोल माहिती दिली.
शंखी गोगलगाय किडीची ओळख
१) शंखीच्या पाठीवर एक ते दिड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.
२) हि किड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्रे पाडते तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपालावर्गीय पिके, फळे, फुले, तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरही उपजिविका करते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
१. जमिनीची खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.
२. रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
३. गुळाच्या द्रावणात (१ किलो गुळ प्रती १० लिटर पाणी) गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात / पिकाच्या ओळीत पसरुन द्यावीत. त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा केरोसीन मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून वरून चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा.
४. लहान गोगलगायीच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.
रासायनिक उपाययोजना
१. मेटाल्डिहाईड २.५ टक्के भुकटीचा (५० ते ८० ग्रॅम / १०० स्क्वे. फूट) वापर गोगलगायी च्या मार्गात पीकाच्या दोन ओळीत किंवा प्रादुर्भावित क्षेत्रात केल्यास गोगलगायीचे चांगले नियंत्रण करता येते.
२. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करता येतो. त्यासाठी गहू किंवा भाताचा भुसा किंवा कोंडा ५० किलो अधिक २५ ग्रॅम यीस्ट गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गुळ प्रती १० लिटर पाणी) १२ ते १५ तास भिजत ठेवावे. त्यात मिथोमिल ४० एस. पी. या कीटकनाशकाची ५० ग्रॅम भुकटी मिसळावी. अशा रितीने तयार केलेले आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावीत शेतात पसरुन द्यावे. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातांमध्ये रबरी मोजे घालून गोळा कराव्यात व १ मीटर खोल खड्डयात पुरून टाकाव्यात.
३. मिथोमिल हे अत्यंत विषारी कीटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी आमिषाने मेलेल्या गोगलगायी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
कार्यक्रमात गावातील श्री. वसंतराव नानाराव देशमुख यांनी त्यांचे अनुभव सांगताना मिठाच्या द्रावणाचा उपयोग करुन गोगलगायीचे व्यवस्थापन केले असे सांगितले. कार्यक्रमात नवखा गावातील शेतकरी श्री. खुषालराव देशमुख, मंचक देशमुख, शंकर देशमुख व इतर सर्व गावकरी मंडळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी साय्यक श्री. निखील राठोड यांनी केले.