ऊसदराच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षागुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले आतापर्यंत दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कारखानदारांसाठी तो एक प्रकारचा धडाच आहे.
गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांनी २०२३-२४ हंगामात गळीतासाठी दिलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला अव्वल दर देत तेथील गणदेवी येथील सहकार खांड उद्योग लि. या साखर कारखान्याने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला एकूण तोडणी वाहतूक खर्च धरून ४,६७५ रुपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले आहे.
प्रतिटन ७७० रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा करता ३९०५ रुपये दर ते देणार आहेत. केवळ ११. ४७ टक्के रिकव्हरी असताना ९ लाख, १४ हजार ४९९ टन उसाचे गाळप करत १० लाख, ४८ हजार, ३३० क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहीती दक्षिण गुजरात सहकारी साखर मिल असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.
गणदेवी कारखान्याने मार्च ३८०५ रु. व फेब्रुवारी २०२४ करता ३७०५ रुपये प्रतिटन तसेच जानेवारी २०२४ सह डिसेंबर, नोव्हेबर, ऑक्टोबर २०२३ या चार महिन्यांत आलेल्या ऊसाला ३६०५ रुपये टन याप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले आहे.
हा दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना मिळणारा दर आहे. बोर्डली साखर कारखान्याची रिकव्हरी १०.८३ टक्के आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २३ व जाने. २४ मध्ये आलेल्या उसाला ३४२३ रु., तर फेब्रु, ३५२३, मार्च ३६२३ रुपये टनांप्रमाणे निव्वळ दर 'गणदेवी' देणार आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील कारखान्यांनी दर द्यावा अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे.
गुजरात राज्यातील कारखान्यांनी जाहीर केलेला ऊसदर
कारखाना | रिकव्हरी | ऊसदर |
सायन | १०.५१ | ३,६५४ |
कामरेज | १०.७२ | ३,५५१ |
मधी | १०.०७ | ३,३२५ |
चलथान | १०.२८ | ३,३२० |
पंडवाई | ०९.७३ | ३,३२१ |
ऊस दरात प्रचंड तफावत
गुजरात राज्यातील ऊस दर पाहता ते दरात अव्वल ठरले आहेत. तसेच गेल्या १७ वर्षांतील महाराष्ट्र व गुजरातच्या ऊसदरातील तफावत प्रचंड आहे.
अधिक वाचा: ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम