Lokmat Agro >शेतशिवार > लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

Gumosis Disease Management in Citrus Fruit Crops | लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा बुरशीच्या वाढीकरीता पोषक परिस्थिती निर्माण होते.

लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा बुरशीच्या वाढीकरीता पोषक परिस्थिती निर्माण होते.

शेअर :

Join us
Join usNext

लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा बुरशीच्या वाढीकरीता पोषक परिस्थिती निर्माण होते. खोल काळ्या, पानबसन, पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी, वाजवीपेक्षा अधिक ओलित व्यवस्थापन आणि चुकीची आंतरमशागत याबाबींमुळे या रोगाचे प्रमाण वाढत असून बागेचा ऱ्हास होण्यामध्ये हा रोग कारणीभूत ठरत आहे. डिंक्या रोगाची लागण झाल्यामुळे झाडांची उत्पादकता कमी होते, झाड खंगत जातात व तीव्रतेनुसार झाडांचा ऱ्हास होतो त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

रोगकारक
डिंक्या रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फायटोप्थोरा निकोत्शियानी व फायटोप्थोरा सीट्रोप्थोरा या बुरशीमुळे होतो. पावसाळ्यात ओलसर व कमी तापमानात फायटोप्थोरा बुरशीच्या बीज पिशव्या तयार होऊन त्यातून बिजाणू पाण्याच्या प्रवाहाबरोबर बागेत पसरतात. झाडाच्या छोट्या मुळांच्या उतीत प्रवेश करून तंतु स्वरूपात विकसित होऊन छोट्या मुळांकडून मुख्य मुळ्याकडे कुजण्यास सुरूवात होते. मुळांची साल कुजल्यामुळे पुढे अन्न शोषण व वहन न झाल्यामुळे झाड खंगत जाते. झाडाच्या मुख्य खोडाच्या किवा फांदीतून डिंक स्त्राव होतो. दुसरे कारण म्हणजे पावसाच्या थेंबाने कण झाडांच्या खोडावर किंवा खोडाच्या भेगांमध्ये जाऊन बसतात किंवा पाण्याचा मुख्य खोडाशी संपर्क झाल्यास यामध्ये फायटोप्थोरा बुरशीचे बीजाणू असल्यास त्या ठिकाणी संसर्ग होऊन झाडाच्या बुंध्यास रोग उद्भवतो. याच बरोबर रोपवाटीकेतील रोगग्रस्त मातीव्दारे मुळांना बुरशीची लागण होऊन अशा रोपवाटीकेतील कलमा लागवडीसाठी उपयोगात आणून शेतात रोगाचा प्रसार होतो.

रोगास अनुकूल वातावरण व घटक
-
पाण्याचा निचरा न होणारी पानबसन जमीनीचा लागवडीसाठी केलेला उपयोग.
- सततचा पाऊस, अंधुक प्रकाश व कमी तापमानात फायटोप्थोरा बुरशीची वाढ अधिक होते.
- रोगास बळी पडणारे खुंटवृक्ष उदा. गलगल, जंबेरी यावर डोळा बांधलेल्या कलमांचा वापर.
- जमिनीलगत रोपांची डोळे असलेली कलमे यांचा उपयोग.
- अतिरिक्त पाण्याचा वापर अर्थात आळ्याने पाणी देणे पद्धत वारंवार जमिनीची खोल आंतरमशागत मुख्यःत झाडाच्या खोडाजवळून रोटाव्हेटर फिरवणे यामुळे मुळ्या तुटून बुरशीचा शिरकाव होतो.

अधिक वाचा: आंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रण कसे कराल?

जखमांमधून रोग प्रसार
पावसाच्या थेंबाने मातीचे कण झाडांच्या खोडावर किंवा खोडाच्या भेगांमध्ये जाऊन बसतात किंवा पाण्याचा मुख्य खोडाशी संपर्क झाल्यास यामध्ये फायटोप्थोरा बुरशीचे बीजाणू असल्यास त्या ठिकाणी संसर्ग होऊन झाडाच्या बुंध्यास रोग उद्भवतो. याच बरोबर रोपवाटीकेतील रोगग्रस्त मातीव्दारे मुळांना बुरशीची लागण होऊन अशा रोपवाटीकेतील कलमा लागवडीसाठी उपयोगात आणून शेतात रोगाचा प्रसार होतो. शेतात सर्वाधिक या रोगाचा प्रसार ओलीताच्या प्रवाहीत पाण्याद्वारे होतो. रोगग्रस्त शेतातील माती आंतरमशागतीच्या वेळेस अवजारानां चिटकून राहते व अशी अवजारे दुसऱ्या शेतात उपयोगात आणल्यास तिथे रोगाचा प्रसार होतो.

रोगाची लक्षणे
या रोगाचा प्रादुर्भाव कलम केलेल्या आसपासच्या भागावर होतो. झाडाच्या बुंध्याची साल फाटून रोगग्रस्त सालीतून डिंक ओघळतांना दिसतो. हा डिंक काळपट रंगाचा पाण्यासारखा असतो व सतत वाहत राहतो. सालीचा आतील भाग करड्या रंगाचा होतो. रोगग्रस्त भागावरील सालीचा रंग क्रमाक्रमाने बदलून काळपट भुरकट होतो, ती निरोगी सालीपासून वेगळी होते. काही दिवसानी रोगट साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात. अशी साल पटाशीच्या सहाय्याने खरवडून काढली तर साली खालील खोड तपकिरी किंवा काळे पडलेले दिसते. झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. पानगळ होते, झाड अशक्त होत जातात, सलटतात व मरतात.

व्यवस्थापन
१) मध्यम खोल, पाण्याचा निचरा होणाऱ्या माती मिश्रीत मुरूम व मुक्त चुन्याचे योग्य प्रमाण असलेली जमीन लिंबूवर्गीय फळ लागवडीस निवडणे.
२) रोगास सहनशील खुंटवृक्षावर (उदा. ऑलिमो, रंगपूर लाईम) डोळे बांधलेल्या कलमांचा वापर लागवडीसाठी करावा.
३) उंच बांधणीची २२.५ ते ३० सें.मी. उंचीवर डोळे बांधलेली कलमे वापरावीत. शेतात कलमयूतीचा भाग २२.५ सें.मी. उंचीवर राहील अशारीतीने कलमांची लागवड करावी.
४) कलमांची लागवड करतांना कलमांना चिकटलेली माती विलग करावी व कलमे लावण्यापूर्वी मेटलेक्झील ०.२५ टक्के (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. मेटलेक्झील ऐवजी उपलब्ध असल्यास जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा किवा सुडोमोनास फ्लूरोसेन्स यांच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लावावीत.
५) या रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आळ्यातून पाणी देण्याची पद्धत बंद करावी कारण या पद्धतीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. झाडाच्या बुंध्याला पाणी लागणार नाही अशा पद्धतीने ओलीत करावे. शक्यतो ओलिताकरीता ठिबक सिंचनाचा वापर करावा.
६) झाडांना पावसाळ्यापूर्वी (एप्रिल-मे महिन्यात) व पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर महिन्यात) वर्षातून दोन वेळा बोडोपेस्ट (१ किलो मोरचूद: १ किलो चुना १० लिटर पाणी) खोडास जमिनीपासून १ मोटर उंची पर्यंत लावावे. तसेच खोडाची रोगग्रस्त साल काढून टाकावी, रोगाची जखम मोठी असेल तर बोडोपेस्ट लावण्यापूर्वी मेटलेक्झील" बुरशीनाशकाचा मलम काढलेल्या जागेवर लावावा व नंतरच बोडोपेस्ट लावावे.
७) डिंक निघत असलेल्या सालीचा भाग निर्जंतुक पटाशीने काढून पोटाशियम परमँगनेट च्या द्रावणाने (१०० ग्रॅम १० लिटर पाणी) धुवून घ्यावा व त्यावर बोडोंपेस्ट लावावी. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा उखरी करून झाडाच्या मुळ्या उघडया कराव्यात व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात. खोदलेल्या वाफ्यात औरिओफंगिन ४६.१५% एसपी १ टक्के तीव्रतेचे द्रावण वाफ्यात मिसळावे. सदर रसायन न मिळाल्यास सायमोक्सणील ८% + मॅन्कोझेब ६४ % डब्लूपी (मिश्र घटक असलेले) बुरशीनाशक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणात जवस तेल २५ मि.लि. मिसळून असे द्रावण वाफ्यात मिसळावे.
८) बागेत पोटाशियम फोस्फोनेट (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या रसायनाच्या दोन फवारण्या ४५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.
९) जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हार्जियानम + सुडोमनास फ्ल्यूरोसन्स १०० ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघातात जमिनीतून द्यावे.
(* शिफारसीत बुरशीनाशके संशोधनाचा आधारावर दिली आहेत, लेबल क्लेमनुसार नाहीत)

डॉ. योगेश इंगळे व डॉ. दिनेश पैठणकर
अ.भा.स.सं. प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Web Title: Gumosis Disease Management in Citrus Fruit Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.