विश्वास पाटील
कोल्हापूर : आई, बहिणींचा शेतजमिनीच्या हिश्यातील हक्क कमी करण्यासाठी हक्कसोडपत्राचा दस्तच करावा लागतो. त्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च आणि दोन-तीन महिने तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत.
या त्रासाला कंटाळूनच शेतकरी आजपर्यंत हक्कसोडपत्र करण्याच्या नादाला लागत नव्हता. परंतु आता नाबार्डने पीककर्ज मिळण्यासाठी सातबारा व ८अ या जमिनीच्या मालकीच्या उताऱ्यांची मागणी केली आहे.
८अ वर जेवढे क्षेत्र तुमच्या नावे नमूद आहे तेवढ्याच क्षेत्राचा विचार करून तुम्हाला पीककर्ज मिळणार असल्याने आता शेतकऱ्यांची हक्कसोडपत्र करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
एकत्र कुटुंबपध्दतीत वडिलांचे निधन झाले की वारस म्हणून मुला-मुलींसह पत्नीचेही नाव मालमत्तेला नोंद होते. जिथे मुले लहान असतील तिथे एकूप म्हणजे एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून मोठ्या भावाचे नाव नोंद होत असे.
बहुजन समाजात अशी धारणा होती की सोने नाणे मुलींला द्यावे व जमीनजुमला मुलांसाठी ठेवावा. त्यामुळे शेतजमिनीची मालकी मुलांकडेच राहत आली. परंतु आता नाबार्डच्या सॉफ्टवेअरने त्यात उलथापालथ केली आहे.
तुमच्या सातबारा उताऱ्यावर हिस्सेदार म्हणून जेवढी नावे आहेत, ते सर्वच जमिनीचे मालक विचारात घेऊन पीककर्ज मंजूर केले जाणार असल्याने शेतकरी कुटुंबात अडचणी आल्या आहेत.
आता जिथे बहिणीशी नाते चांगले आहे, त्या बहिणी हक्कसोडपत्र करून देतील परंतु अनेक कारणांने नात्यात कटूता आलेली असते. त्यामुळे हक्कसोडपत्र करणे जिकिरीचे होऊन बसले आहे.
ही सगळी प्रक्रिया महसूल खात्याशी संबंधित आहे. तिथे प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागतो. त्यामुळे किमान दहा हजार खर्च आणि हेलपाटे मारल्याशिवाय हे सोडपत्र होणार नाही. शेतकऱ्यांनी त्याची तयारी करायला हवी.
हक्कसोडपत्रासाठी काय लागतात कागदपत्रे
● जेवढ्या जमिनीला आई, बहिणींची नावे आहेत, त्या सर्वच क्षेत्राचे तीन महिन्यांच्या आतील सातबारा व ८अचे उतारे.
● वडिलांचे निधन झाल्यानंतर तुमची नावे ज्या डायरीने नोंद झाली ती वारसाच्या डायरीची नक्कल.
● सगळ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स.
● सर्वांचे फोटो.
हक्कसोडपत्रासाठी प्रक्रिया कशी असते?
● हक्कसोडपत्र करणे हा कोणत्याही जमीन किंवा स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताइतकाच महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
● तो ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर रजिस्टर करावा लागतो.
● त्यासाठी किमान नोंदणी शुल्क २०० रुपये आहे.
● तुमच्या तालुक्याच्या उपनिबंधक कार्यालयात जावून हा हक्कसोडपत्राचा दस्त करावा लागतो.
● सगळ्या जमिनीचे हक्कसोडपत्र एकाच दस्ताने करता येते.
● हे हक्कसोडपत्र आले की त्याच्या प्रतिसह इंडेक्स २ जोडून गाव तलाठ्याकडे ज्यांनी हक्कसोडपत्र करून दिले आहे त्यांचे नाव जमिनीच्या मालकी हक्कातून कमी करण्यासाठी अर्ज करावा लागतो.
● तलाठी हा अर्ज आल्यावर संबंधितांना नोटीस काढतो. त्यावर हरकत घेण्यास १५ दिवसांची मुदत असते.
● त्यानंतर तलाठी संबंधितांची नावे कमी करतो.
● त्यास मंडळ अधिकारी यांनी मंजुरी दिली द्यावी लागते. त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच ज्यांनी हक्क सोडपत्र करून दिले त्यांची नावे सातबारा व ८अ वरून कमी होतात.
अधिक वाचा: Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात