Join us

शेतकरी अन् उत्पादक कंपनी प्रतिनिधींमध्ये हमरातुमरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 9:47 AM

कार्यशाळा : अधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिक : कांदा खरेदीचे सूत्र समजून सांगण्यासाठी केंद्र शासन अंगिकृत नाफेड व एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी येथे शुक्रवारी (दि. १२) शेतकरी, शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी व फेडरेशनच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा घेतली. मात्र, कार्यशाळेत फक्त २० टक्के शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना फोनद्वारे तर सोडा वृत्तपत्राच्या माध्यमातूनदेखील या कार्यशाळेची माहिती देण्यात आली नाही. इथे शेतकरी नाही तर सरकारचे हित पाहणारे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधीच हजर असल्याचे काही शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगताच आम्हीदेखील शेतकरीच आहोत, अशी बाजू शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडली. या मुद्द्यावरून चांगलीच हमरातुमरी झाली. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिशा जोसेफ चंद्रा,

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे संचालक एस. सी. मीना, नाफेडचे अर्थविषयक सल्लागार आय. एस. नेगी, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार सिंग यांनी या कार्यशाळेत संवाद साधला. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी प्रथम आपले म्हणणे मांडले. पंचताराकितसारख्या हॉटेलमध्ये कार्यशाळा का ठेवली? हीच कार्यशाळा शेताच्या बांधावर येऊन ठेवता आली नसती का? तिथे शेतकरी अधिक प्रमाणात आले असते, अशी ओरड शेतकऱ्यांनी केली. कांदा खरेदी बाजार समितीमार्फत सुरू करावी, भाव समाधानकारक द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

विक्रम पाटील तसेच इतर शेतकऱ्यांनीदेखील कांदा खरेदी करण्याचे जाहीर होते. पण, भाव मात्र सरकारी पद्धतीने वाढीव दिला जात नाही, अशी ओरड केली. अनिशा जोसेफ चंद्रा यांनी कांद्याला बाजारात जो भाव असेल तो दिला जाईल, असे सांगून शेतकरी हितासाठीच दौरा असल्याचे सांगितले.

टॅग्स :कांदाबाजारनाशिक