Pune : फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक बाजारात होऊ लागली आहे. त्यातच रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची वाट आपण सगळेच पाहतो. सध्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढताना दिसत आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचे उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे दर चढेच असतील अशी भावना गुलटेकडी मार्केट यार्डातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चार दिवसांवर आलेला गुढीपाडवा आणि पाच दिवसांवर आलेले मार्च एंडमुळे सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. यासोबतच यंदाच्या वर्षी हापूस आंब्याचे उत्पादन हे तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची भिती व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीये.
यामुळे संपूर्ण हंगामात कोकणातील हापूस आंब्याचे दर वाढलेले असतील. पण साधारण एक महिन्यानंतर कर्नाटकी हापूस, केशर, तोतापुरी, बदामी आंबा बाजारात आल्यावर हापूसला दर मिळण्यासाठी धडपड करावी लागेल.
खऱ्या अर्थाने फेब्रुवारी महिन्यातच मुहूर्ताची पेटी पुणे मार्केट यार्ड येथे दाखल झाली होती. त्यानंतर साधारण तीन आठवडे हापूसची आवक खूपच कमी होती. पण आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक सुरू झाली आहे.
किती आहेत दर?ग्राहकांसाठी सध्या हापूसचे दर हे १ हजार रूपयांपासून २ हजार रूपये प्रतिडझन एवढे आहेत. मागच्या वर्षी आवक जास्त होती त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबे हे ७०० ते ८०० रूपये डझनाने मिळत होते. पण यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढलेले आहेत. आंब्याच्या वजनानुसार आणि आकारानुसार दर कमी जास्त असणार आहेत.