पुणे : आंब्याचा हंगाम सध्या जोरात सुरू असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील आंबे बाजारात येऊ लागले आहेत. कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केशर आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून येणाऱ्या काळात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि गुढीपाडव्याला आंब्याची मागणीही वाढत असते. पण आपण जो रशरशीत हापूस आंबा खातो तो आंबा नैसर्गिक पद्धतीमध्ये कसा पिकवला जातो यासंदर्भात आपल्याला माहिती आहे का?
दरम्यान, अनेक शेतकरी थेट व्यापाऱ्यांना आंब्याची विक्री करतात आणि व्यापारी आंब्याची कमी वेळेत चांगल्या दराने विक्री व्हावी या अनुषंगाने रसायनिक पद्धतीने आंबा पिकवतात. पण जे आंबा उत्पादक शेतकरी थेट ग्राहकांना आंब्याची विक्री करतात असे शेतकरी नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवतात.
आंब्याची काढणी झाल्यानंतर आकारानुसार त्याची प्रतवारी केली जाते. तर प्रतवारीनुसार वेगवेगळे भाग करून आंबा पिकवण्यासाठी आडी टाकली जाते. यामध्ये खाली वाळलेले गवत टाकून त्यावर आंबे पिकवण्यासाठी ठेवले जातात. भाताचा, गव्हाचा आणि इतर गवताचा वापर आंबे पिकवण्यासाठी केला जातो. आडीला ठेवल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये आंबे पिकतात असे जाणकार सांगतात.
हापूस आंबा पिकल्यानंतर तो पाच ते सात दिवस खाण्यायोग्य राहतो. हापूस आंबा पिकल्यानंतरही कडक असतो हे विशेष. जास्त पिकल्यानंतर आंब्याच्या कातडीवर सुरकुत्या पडतात पण आतून बिलबिला होत नाही. आंबा पिकल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर तो खराब होण्यास सुरूवात होतो. त्या अगोदर हा आंबा खाल्ला पाहिजे असं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.