Lokmat Agro >शेतशिवार > Hapus Mango Season अनेक संकटे झेलून अखेर हापूस हंगामाचा निरोप

Hapus Mango Season अनेक संकटे झेलून अखेर हापूस हंगामाचा निरोप

Hapus Mango Season; end of the season of Hapus mango this year after many problems | Hapus Mango Season अनेक संकटे झेलून अखेर हापूस हंगामाचा निरोप

Hapus Mango Season अनेक संकटे झेलून अखेर हापूस हंगामाचा निरोप

सतत बदलते हवामान आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदाही कोकणातील हापूसचा बाजार कोलमडला आहे. बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून हापूसने निरोप घेतला आहे.

सतत बदलते हवामान आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदाही कोकणातील हापूसचा बाजार कोलमडला आहे. बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून हापूसने निरोप घेतला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी : सतत बदलते हवामान आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदाही कोकणातील हापूसचा बाजार कोलमडला आहे. बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून हापूसने निरोप घेतला आहे.

शेवटच्या टप्प्यातील एक ते दोन टक्के बागायतदारांकडे आंबा झाडावर असला, तरी त्याचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. आंबा हंगामाच्या सुरूवातीला बाजारभाव कमी राहिल्याने बागायतदारांना त्याचा फटका बसला आहे.

जिल्ह्याच्या अर्थकारणात खूप महत्त्वाचा असलेला हापूस आंबा हंगाम संपला आहे. अनेक बागायदारांकडील आंबा काढून संपला असून, त्यांनी बागांची सफाई, खते घालण्याचे काम सुरू केले आहे. काही बागायतदार रासायनिक खते खरेदी करत आहेत, तर काही सेंद्रिय खते खरेदी करून कलमांना घालत आहेत.

पावसापूर्वी खते घातली व त्यानंतर पाऊस सुरू झाल्यास खते कलमांच्या मुळापर्यंत जाऊन झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे आत्तापासूनच खते घालण्याचे काम सुरू झाले आहे.

गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवली व नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच मोहर प्रक्रिया सुरू झाली. मोहरासोबतच बागायतदारांच्या अपेक्षाही पल्लवित झाल्या होत्या. मात्र अवकाळी पाऊस, थ्रीप्स, तुडतुडा, बुरशीसदृश्य रोगामुळे बागायतदारांना हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशक फवारणी करावी लागली.

महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स नियंत्रणात येत नसल्यामुळे बागायतदार हैराण झाले. कोकण कृषी विद्यापीठालाही निवेदन देत थ्रीप्सवरील प्रभावी कीटकनाशक संशोधनाची मागणी करण्यात आली.

कीटकनाशकांनाही दाद नाही
कीटकनाशकांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिवाय महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. त्यामुळे बागायतदारांचा खर्च वाढतो आणि पदरी नुकसानच येते. त्यामुळे थ्रीप्ससारखे रोग आटोक्यात आणण्याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आता दापोली कृषी विद्यापीठाने विशेष पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

दराची शिडी गडबडली
• नैसर्गिक दृष्टचक्रातून वाचलेला हापूस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला दर चांगले होते. मात्र आंब्याची काही प्रमाणात आवक वाढली व दर गडगडले.
• वास्तविक दि. २० एप्रिलपर्यंत ३००० ते ७००० रुपये पेटीला दर मिळणे अपेक्षित होते. मात्र यावर्षी १५०० ते ३५०० रुपये इतकेच दर राहिले. हंगामाच्या शेवटी मात्र १००० ते १८०० रुपये दर टिकून होते.
• हंगामाच्या सुरुवातीला दर चांगला मिळाला तर बागायतदारांचा खर्च वसूल होतो. मात्र सुरुवातीलाच दर कमी राहिल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकूणच आंबा हंगाम संपला तरी बागायतदारांची गणिते मात्र विस्कटली आहेत.

कीटकनाशकांचे वाढते दर, वाहतूक खर्च, मजुरी, लाकडी खोका व एकूणच खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात जाईपर्यंत पेटीला किमान ३००० रुपये खर्च येतो. त्यामुळे तेवढा मिळावा, अशी मागणी बागायतदारांनीही केली होती. यावर्षी फळधारणा चांगली झाली. मात्र अपेक्षित दर न मिळाल्यामुळे गणिते पुन्हा विस्कटली आहेत. - राजन कदम, बागायतदार 

अधिक वाचा: Mango Export: आंब्याला निर्यातीचा गोडवा, आत्तापर्यंत परदेशात २,०५७ मेट्रिक टन निर्यात

Web Title: Hapus Mango Season; end of the season of Hapus mango this year after many problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.