Harbhara lagwad : जालना जिल्ह्यात दरवर्षी जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड होते. मात्र मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील हरभरा लागवड क्षेत्रात मोठी घट झाली होती.
यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी हरभरा क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. हरभरा या पिकास कमीत कमी पाणी लागते. शिवाय कोरडी, मध्यम ते काळी कसदार व चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.
मागील वर्षी हरभरा पिकाचे क्षेत्र १ लाख हेक्टरवरून ८४ हजार ५०४ हेक्टरवर आले होते. परंतु यावर्षी १ लाख ५ हजारपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. हरभरा पिकाची १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान पेरणी करणे योग्य मानले जाते.
पाण्याचे असे करा व्यवस्थापन
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. साधारणतः हरभरा पिकास फुलोरा येण्यापूर्वी व घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी देणे गरजेचे असते. पिकास प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास पिकावर मूळकूज नावाचा रोग पडतो. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे असते.
उत्पादनात वाढ होईल
शेतकऱ्यांनी सुधारित वाणांचा व तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास सरासरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. - भरत नागरे, कृषी विभाग, जालना
अशी करा आंतरमशागत
• हे पीक २० ते २५ दिवसांचे असताना एक कोळपणी व ३० ते ३५ दिवसांचे असताना शेतकऱ्यांनी एक खुरपणी करावी.
• पीक ४० दिवसाचे असतांना त्यांचे शेंडे खुडल्यास पिकांना जास्त फांद्या फुटतात व घाटे चांगले लागतात.
• परिणामी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची मशागत करण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.