Join us

Harbhara Mar Rog Niyantran : हरभरा पिकावरील मर रोगाचे कसे करावे व्यवस्थापन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:41 PM

हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे ते वाचा सविस्तर (Harbhara Mar Rog Niyantran)

Harbhara Mar Rog Niyantran : हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी माहे सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हरभरा पीक लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सन २०२३-२४ मध्ये हरभरा पिकाची ८४ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षांत हरभरा पिकाच्या उत्पादनात घट झाली होती. याचे मुख्य कारण हरभरा पिकावर पडणारा मर रोग असल्याचे सांगण्यात येते. हा रोग फ्युजारियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीमधून आणि बियाणाद्वारे होतो.

ही बुरशी झाडाच्या अन्नद्रव्य वहन करणाऱ्या पेशीला मारते आणि जवळपास सहा वर्षांपर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. या रोगामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होत असल्याचे दिसत आहे.

अशी आहेत मर रोगाची लक्षणे

• रोप अवस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकून वाळतात, रोगग्रस्त झाडांचा जमिनीवरचा भाग, देठ व पाने सुकतात.

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी आवश्यक

● पेरणीपूर्वी बियाण्यास बायोमिक्स १० मिली किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक एकर क्षेत्रासाठी ४ लिटर बायोमिक्स शेण खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून शेतामध्ये टाकावे. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बायोमिक्स १०० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

● तसेच रोगाचा आढळून आल्यास बायोमिक्स २०० मिली किंवा प्रोपिकोनाझोल २५ टक्के, ई. सी. (टिल्ट) १५ ग्रॅम किंवा टेबुकोना झोल ५० टक्के, ट्रायक्लॉक्सिस्ट्रॉबीन २५ टक्के, डब्ल्यु, जी. (नेटिवो) ७ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ई. सी. (कॉन्टाफ प्लस) ७ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाइल ७० टक्के, डब्लू, पी. (रोको) १५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

रोगाचे व्यवस्थापन गरजेचे

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, नियमित पिकाची फेरपालट करावी, पिकाची १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी, पेरणीच्या वेळी बियाणे ८ ते १० सेंमी खोलीवर पेरावेत, पिकामध्ये आंतरपीक म्हणून मोहरी किंवा जवस या पिकाची लागवड करावी. तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मर रोग प्रतिकारक्षम वाणाची निवड करावी. - भरत नागरे, मंडळ कृषी अधिकारी, जालना

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराशेतकरीशेती