Join us

हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 9:04 AM

यंदा अवकाळी पावसामुळे हरभरा पिकांचे नुकसान

रब्बी पिकांच्या सुरुवातीस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यात हरभरा पिकाला याचा फटका बसला आहे. परिणामी भाजी बाजारात हरभऱ्याची भाजी अद्याप आलेलीच नाही. त्यामुळे आवडीने भाकरीसोबत खाण्यात येणारी हरभऱ्याची भाजी ताटातून गायब झाली आहे.

तालुक्यात दरवर्षी हरभरा पिकाचा पेरा शेतकरी मोठ्या संख्येने करतात. यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात ४ हजार १३ हेक्टर हरभऱ्याच्या पेरा झाला आहे, तर मागील वर्षी ४ हजार ६१९ हेक्टरवर पेरा झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस व अवकाळीमुळे ६०६ हेक्टरने पेरा घटला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे यंदा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रब्बीत हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर काही दिवसांत त्याची भाजी खुडली जाते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे हरभरा पिकांचे नुकसान झाले, तर काही भागात उशिरा हरभऱ्याची लागवड झाली आहे. बाजारात हिवाळ्यातील भाजीपाल्याची मोठी आवक सध्या असून, भावही समाधानकारक आहेत. मात्र, यंदा हरभऱ्याची भाजी अद्याप बाजारात विक्रीला आलेली नाही. त्यामुळे तिची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अजून काही दिवस या भाजीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उशीरा लागवड झाल्यामुळे लवकरच ही भाजी बाजारात येईल, असा अंदाज आहे.

उत्पादनावरही होणार परिणाम

गंगापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी आठवड्यांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. ते पीकही चांगले उगवून आले.यातच आता मागील काही दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. बदलत्या वातावरणात उरलेले हरभरा पीकही हातातून जाण्याची भीती आहे. यात कृषीविभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या एकंदरीत वातावरणामुळे तालुक्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटणार असल्याचा कृषी तज्ञांचे म्हणणे आहे.

हरभऱ्याच्या भाजीतील गुणधर्म

  • भरपूर प्रोटीन अन् कॅल्शिअमने परिपूर्ण
  • हरभऱ्याच्या भाजीत भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असते. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
  •   हरभरा भाजीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात तिला खूप पसंत केले जाते. तिला वाळवून वर्षभर उपयोगात आणले जाते.
टॅग्स :हरभरापीकबाजार