Join us

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तर उपाध्यक्ष केतनभाई पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 4:10 PM

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री. केतनभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. नवी दिल्ली येथे शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या नव निर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निवड झाली. श्री. हर्षवर्धन पाटील व श्री. केतनभाई पटेल यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असेल.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री. केतनभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. नवी दिल्ली येथे शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या नव निर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निवड झाली. हर्षवर्धन पाटील व केतनभाई पटेल यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असेल.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा नवी दिल्ली येथे गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी झाली. याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे होते. एन.सी.यु.आय. च्या सभागृहात झालेल्या या बैठकीत १२ संचालकांची निवड करण्यात आली.

हर्षवर्धन पाटील यांचा सहकार क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १९९५ ते २०१४ या कालावधीत मंत्री म्हणून विविध खाती समर्थपणे हाताळली आणि त्यावर आपली छाप पाडली आहे. ते पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे रहिवासी आहेत. केतनभाई पटेल यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून गेली पाच वर्षे काम केले होते आणि या पदावर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली.

श्री. पाटील आणि श्री. पटेल यांच्या निवडीची औपचारिक घोषणा निर्वाचन अधिकारी मेकाला चैतन्य प्रसाद (आय.ए.एस) यांनी केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मावळते अध्यक्ष श्री. दांडेगावकर यांनी हर्षवर्धन पाटील आणि केतनभाई पटेल यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे मागील पाच वर्षाच्या काळात देशातील सहकारी साखर कारखाने व साखर संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारही  मानले.

दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ ही देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व साखर संघांची शिखर संस्था असून साखर कारखाने व केंद्र सरकार यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करीत आहे. साखरेचे धोरण ठरविण्यात महत्वाचे योगदान करणे, साखर उदयोगासमोरील प्रश्नांचा केंद्र सरकार मधील संबंधित मंत्रालयाशी पाठपुरावा करणे, साखर कारखान्यांच्या उभारणीत, विस्तारात, आधुनिकीकरणात त्यांना मदत करणे, तांत्रिक, व्यवसायिक आणि इतर प्रश्नांबाबत त्यांना तज्ज्ञांची मदत पुरविण्याचे काम साखर कारखाना महासंघ गेल्या अनेक दशकांपासून करत आहे.  

आर्थिक सुधार आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे या काळात देशातील साखर उत्पादनात ३५ टक्के वाटा हा सहकार क्षेत्राचा आहे. केंद्र शासनाने नवे सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविल्यापासून देशभरातील संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. केवळ २७ महिन्यात ५४ नवे निर्णय घेण्याचा विक्रम या नव्या सहकार मंत्रालयाने केला आहे आणि त्यातील बऱ्याच निर्णयांची अंमलबजावणी देखील सुरु असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :ऊसदिल्लीसाखर कारखानेइंदापूरअमित शाह