Beed Rain Crop Damage : राज्यभरात सध्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यात पडत असलेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे कांद्याचे पीक वाहून गेले आहे. वाहून गेलेले कांदे शेजारील सखोल भागातील शेतातील पाण्यात तरंगताना दिसत आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर निसर्ग शेतकऱ्यांच्या तोंडून घास हिसकावून घेत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश जवळील बेलगाव येथील आश्रुबा प्रभु कोळपे या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचे पीक पावसामुळे अक्षरशः वाहून गेले आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकर कांद्याची लागवड केली होती. त्यातील एका एकरवरील कांदा काढणीला आला होता. तो कांदा कालच्या पावसामुळे वाहून गेला आहे. पाण्यावर तरंगत असलेला कांदा शेतकऱ्याकडून शेतातून बाजूला काढला जात आहे.
यासंदर्भात लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी,मंडळ अधिकारी अशोक डरपे,तलाठी नेवडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या बदलीनंतर अतिरिक्त पदभार स्वीकारलेले साळवे, कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधत नुकसानीचे व्हिडिओ आणि फोटो पाठवून तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
पीकविम्याच्या तक्रारीसाठी शेतकऱ्यांना मदत
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची माहिती पीकविमा अॅपच्या माध्यमातून भरायची असते. माहिती भरल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी हे पंचनाम्यासाठी बांधावर येतात पण ग्रामीण भागातील बहुतांश अडाणी शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता येत नसल्याने डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांचे सहकारी परिसरातील शेतकऱ्यांना पिकविम्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी मदत करतात.
कालच्या पावसामुळे एका एकरातील कांदा पुराच्या पाण्यावर तरंगत आहे. आम्ही हा कांदा पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. रात्रभर पावसात कांदा कुजल्याने बाजारात भाव मिळत नाही, त्यामुळे संपूर्ण कांदा पीक वाया गेले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- आश्रुबा कोळपे (नुकसानग्रस्त शेतकरी, बीड)