यावर्षी शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती दिली आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी केलेला गहू काढणीला आला आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने गहू काढणी करीत असल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नसल्याने सोंगणीऐवजी शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत.
शेतकरी काही वर्षांआधी गहू विळ्याने सोंगणी करून बांधणी करीत होते व तो एकत्र गोळा करून खळ करीत होते. त्यानंतर त्यामध्ये बडवून काढत असे. मात्र, आता मजूर मिळत नसल्याने व मळणी मशीन आल्यानंतर सोयीचे ठरत असल्याने गहू काढणे, बांधणी करणे, त्यानंतर एकत्र गोळा करून तो पेंढ्या अर्धवट कापून लोंब्या मशीनमध्ये टाकून गव्हाची मळणी केली जात होती. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू काढणी सुरू आहे.
यावर्षी गव्हाच्या पेरा मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकरी हार्वेस्टरने गहू काढत असल्याचे चित्र उमरा शिवारात दिसत आहे. त्यामुळे अडीच ते तीन हजार रुपये एकरी काढणी खर्च शेतकऱ्याला येत आहे.
एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन
नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन होत आहे, तर जानेवारीत पेरणी केलेला गहू पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील पिकासह रब्बी हंगामातील पिकांनी शेतकऱ्याला दगाच दिला आहे. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा भागवावा, लग्न सराईत कसे जावे, अशा विवंचनेत शेतकरी आहे.
शेतकऱ्यांचा गहू मार्केटमध्ये येताच २३०० ते २७०० रुपये क्विंटलप्रमाणे पिकाला भाव मिळत आहे. आधीच उत्पादन कमी झाले, त्यातच भावही मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.विजय भगत, शेतकरी, उमरा.
उमरा शिवारात आधी गव्हाच्या गवत्याला जनावरांना चारा व अल्पमध्ये वापरला जात होता. त्यामुळे गवंड्याची चांगलीच मागणी होती. शेतकऱ्यांनी सोंगणी केलेल्या गव्हाला लावलेला खर्च निघायचा. मात्र, आता तो चारा हार्वेस्टरमुळे वाया जात असल्याने चाराटंचाईच्या समोर शेतकऱ्यांना जावे लागत आहे.- योगेश गवळी, शेतकरी, उमरायावर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात सतत धुके पडल्याने गहू पिकांवर शेंडअळी आल्याने यावर्षी उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यामुळे गहू पिकावर केलेला खर्चही निघत नाही.शंतनू खवले, शेतकरी, उमरा.