हरियाणामध्ये औद्योगिकीकरण आणि विकासकामांमुळे लागवडीखालील जमीन कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कमाल जमीन धारणा कमी होत चालली असून अनेक शेतकरी बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत. यावर उपाय म्हणून या शेतकऱ्यांना आफ्रिकेतील देशांमध्ये शेती करायला धाडण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतलाा आहे. तेथील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान ४ हजार तरुणांनी इस्रायलला जाण्यासाठी दाखवली स्वारस्य दाखवल्याचेही सरकारने सांगितले आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षणही देणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आफ्रिकन देशांमध्ये पाठवून त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड कृषी क्षमतेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे. ज्याचा मुख्य उद्देश हरियाणातील शेतकऱ्यांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा आहे. आफ्रिकन राजदूतांशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकार सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे.
या सामंजस्य करारानंतर, या अनोख्या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांचा एक गट तयार करून आफ्रिकन देशांमध्ये पाठवला जाईल. तेथे उपलब्ध असलेल्या जमिनीवर ते शेती करू शकतील. परदेशात पाठवण्यापूर्वी, सरकार त्यांना व्यापक प्रशिक्षण आणि आवश्यक सहाय्य देखील देणार आहे.
सध्या हरियाणातील तरुण बेकायदेशीरपणे परदेशात जातात. ते थांबवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून इच्छूक व्यक्तींना कायदेशीर संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने फॉरेन कोऑपरेशन डिपार्टमेंट आणि फॉरेन प्लेसमेंट सेलची स्थापना केली असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. खट्टर यांनी दिली. इस्रायलमधील आवश्यक मनुष्यबळाच्या विनंतीवरून राज्य सरकारने जाहिरात दिल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी सांगितले. ज्यामध्ये राज्यातील ४ हजार तरुणांनी रस दाखवला. त्यांना एमडीयू रोहतक येथे प्रशिक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले.