Lokmat Agro >शेतशिवार > शंखी गोगलगाय आली आहे ? घाबरू नका वेळीच नियंत्रण करा

शंखी गोगलगाय आली आहे ? घाबरू नका वेळीच नियंत्रण करा

Has the snail arrived in field? Don't panic control it in timely | शंखी गोगलगाय आली आहे ? घाबरू नका वेळीच नियंत्रण करा

शंखी गोगलगाय आली आहे ? घाबरू नका वेळीच नियंत्रण करा

गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे.

गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गोगलगाय एक मृदुकाय प्राणी आहे. शंखी गोगलगायीच्या अचॅटिना फ्युलिका या प्रजातीचा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विविध पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही जमिनीवर आढळणारी पिकांना सर्वात जास्त नुकसानकारक गोगलगाय म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये सर्वप्रथम १८४६-४७ मध्ये ओरिसा राज्यामध्ये या गोगलगायाची नोंद झाली आहे. आता संपूर्ण भारतामध्ये सर्व राज्यात हिचा प्रसार झाला आहे. ही गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे.

नुकसानीचा प्रकार

  • शंखी गोगलगाय सर्व प्रकारची पिके तृणधान्ये, भाजीपाला, फळपिके व शोभिवंत झाडांना नुकसान पोहचविते.
  • रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकतात.
  • गोगलगाय झाडाची पाने, फुले, फळे, खोड व मुळा खरवडून खाते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडावरील पूर्ण पाने फस्त करतात, तसेच चिकट द्रावाचे चमकदार पट्टे दिसून येतात.
  • या गोगलगायी निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात.


जीवनक्रम

शंखी गोगलगायीच्या अचॅटिना फ्युलिका या प्रजातीमध्ये एकाच गोगलगायीमध्ये नर व मादीची अवयवे असतात. पण प्रजननासाठी दोन गोगलगायीचे मिलन होणे गरजेचे असते. जर एकाच आकाराच्या दोन गोगलगायीचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. जर एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. अंडी ही ओलसर जमिनीमध्ये पुंजक्यात दिली जातात. एका पुंजक्यात साधारपणे २०० अंडी असतात.  एक गोगलगाय अंडीची ५ ते ६ पुंजके एका वर्षात घालते. अंडी पांढरट साबुदाण्यासारखी असतात.  अंडयातून एक दोन आठवडयातून लहान गोगलगायी बाहेर निघतात व त्यांचे ६ महिन्यामध्ये प्रौढात रूपांतर होते. सर्वसाधारपणे या गोगलगायी ५ ते ६ वर्ष जीवंत राहतात. प्रतिकूल वातावरणात या गोगलगायी तीन वर्षापर्यंत जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहू शकतात.

गोगलगायीचा प्रसार

  • शेतातील वापरात असलेली अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, जनावरे, वाहने यामार्फत होतो.
  • रोपे, कुंड्या, बेणे इत्यादी मार्फत सुध्दा प्रसार होतो.


एकात्मिक व्यवस्थापन

मशागतीय पद्धती

  • जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील गोगलगायी व तिची अंडी उघडे पडून सूर्यप्रकाश व नैसर्गिक शत्रूमुळे नष्ट होतील.
  • पिकामध्ये कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या गोगलगायी उघडया पडून नष्ट होतील.
  • भाजीपाला पिकाच्या भोवती झेंडू सापळा पीक म्हणून लावावे.
  • फळझाडे, तुती बागेमध्ये व बाजूला वेलवर्गीय पिके जसे चवळी, शेंगवर्गीय भाजीपाला यांची लागवड करू नये.
  • तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आर्द्रता कमी होईल. त्यामुळे गोगलगायींना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल.
  • शेतातील अवजारे, साहित्य दुस­या जागी घेऊन जाताना स्वच्छ करून घेऊन जावे. जेणेकरून त्यासोबत गोगलगायीचा प्रसार होऊ नये.


यांत्रिक पद्धती

  • गोगलगायी लपण्याच्या जागा विशेष लक्ष्य देऊन शोधावे आणि त्या नष्ट करावे.
  • गोगलगायी हाताने वेचून नष्ट करणे : सुरुवातीला दररोज गोगलगायी हाताने वेचून मिठाच्या द्रावणात (१ किलो मीठ + ४ लिटर पाणी) टाकून नष्ट करावे. गोगलगायींची संख्या कमी झाल्यास आठवड्यातून एकदा वेचून नष्ट करावे. गोगलगायी वेचताना हातमोजे वापरणे आवश्यक आहे, कारण गोगलगायींमुळे काही रोग मानवाला होऊ शकतात.
  • पावसाळ्यामध्ये सायंकाळी गोणपाट गूळ / मीठ याच्या द्रावणात बुडवून किंवा पपईच्या खोडाचे तुकडे / पानकोबीची पाने गोगलगायी लपण्याच्या संभाव्य ठिकाणी व शेतामध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी जमा झालेल्या गोगलगायी वेचून मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करावे.
  • अडथळा किंवा प्रतिबंध निर्माण करणे : तांब्याची जाळी व पत्रा, चुना किंवा ब्लिचिंग पावडरचा वापर
  • तांब्याची जाळी व पत्र्याचा वापर : गोगलगायीद्वारा स्त्रवणारा चिकट पदार्थ व तांबे यांची क्रिया होऊन गोगलगायीच्या मज्जासंस्थेवर विद्युत झटक्यासारखा परिणाम होतो. तांब्याची जाळी व पत्र्याचा वापर करावा.  
  • रोपवाटिकेत तांबे या धातूची जाळी वाफ्याभोवती लावावी. ही जाळी १-२ इंच जमिनीत गाढवी आणि २ इंच जमिनीच्या वर राहावी.
  • फळझाडांच्या खोडावर तांब्याचा ८ इंच रुंदीचा पत्रा लावावा. खोडाच्या वाढीनुसार पत्रा खोडाभोवती लावण्यात बदल करावा.
  • चुना किंवा ब्लिचिंग पावडर : चुना किंवा ब्लिचिंग पावडर पिकाभोवती टाकावी. साधारणपणे २-३ इंचाचा पट्टा असावा. ही क्रिया दुपारनंतर करावी आणि पावसाची शक्यता असल्यास करू नये.


जैविक पद्धती

  • पिवळी कण्हेरी, सीताफळ, रामफळ याच्या पानाच्या रसाचा वापर गोगलगायींवर करता येतो.
  • नैसर्गिक शत्रू : जमिनीवरील भुंगेरे, भक्षक गोगलगाय (Euglandia rosea), उंदीर, साप, बेडूक, पक्षी  इत्यादी


रासायनिक पद्धती

मेटाल्डीहाईडचा वापर

  • मेटाल्डीहाईड खाल्ल्यानंतर गोगलगाय जास्त प्रमाणात चिकट द्राव स्रवते, त्यामुळे तिचा मृत्यू होतो.
  • मेटाल्डीहाईड २.५ % गोळी (स्नेलकिल) शेतामध्ये जागोजागी टाकावे (२-३ गोळ्या/ठिकाणी). १ एकरासाठी २ किलो मेटाल्डीहाईड वापरावे.
  • मेटाल्डीहाईडच्या गोळ्या गोगलगायी लपण्याच्या ठिकाणी, सेंद्रिय खताचे खड्डे व ओलसर ठिकाणी ठेवावे.
  • मेटाल्डीहाईड हे पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर इत्यादी) यांना हानिकारक आहे. गोळ्यांकडे कुत्रे आकर्षित होतात. म्हणून जेथे पाळीव प्राणी व लहान मुलांचा वावर आहे, अशा ठिकाणी मेटाल्डीहाईडच्या गोळ्याचा वापर करू नये.
  • पाऊस, जास्त आर्द्रता व सूर्यप्रकाश यामुळे मेटाल्डीहाईडची तीव्रता कमी होते, त्यामुळे वापर करताना या बाबी लक्षात घ्यावा.
  • मेटाल्डीहाईड हे रेशीम अळ्या व तुतीसाठी हानिकारक नाही, त्यामुळे रेशीम उत्पादक याचा वापर करू शकतात.


विषारी आमिषाचा वापर

  • गव्हाचे पीठ / भाताचा भुसा (१ किलो) + गुळाचे पाक (२०० ग्रॅम गूळ) + कीटकनाशक (मिथोमिल ४० एसपी २५० ग्रॅम) याचे विषारी आमिष तयार करावे. गूळ व थोडे पाणी कमी उष्णतेवर गरम करून पाक तयार करावा. यात गव्हाचे पीठ / भाताचा भुसा व कीटकनाशक मिसळावे. याचे लहान गोळे करून १० ठिकाणी / एकर ठेवावे. हे तयार करताना व शेतात ठेवताना हातमोज्याचा वापर करावा.
  • विषारी आमिष ठेवलेल्या ठिकाणापासून पाळीव प्राणी व कोंडी यांना दूर ठेवावे.
  • या आमिषासोबत पानकोबीची पाने किंवा पपईच्या खोडाचे तुकडे गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी ठेवावे.

काटेकोर दक्षता, लोक शिक्षण, कीड जमा करून नष्ट करणे, मेटाल्डीहाईड व विषारी आमिषांचा वापर  करून सामुहिक प्रयत्न केल्यास शंखी गोगलगायीचे यशस्वी नियंत्रण होईल.

डॉ. बस्वराज भेदे
सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, कापूस संशोधन केंद्र, नांदेड

 

Web Title: Has the snail arrived in field? Don't panic control it in timely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.