नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात झालेल्या चर्चेत या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाली.
त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेत या तीन राज्यांतील नव्या नेतृत्वाच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भोपाळ, रायपूर आणि जयपूर येथे होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या नावांची घोषणा केली जाणार आहे.
विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी?येत्या एक-दोन दिवसांत या तीन राज्यांत केंदीय निरीक्षक पाठवले जातील. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्यांच्या नावाची घोषणा करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप तिन्ही राज्यांमध्ये नव्या चेहयांना संधी देऊ शकते. शनिवारी किंवा रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाऊ शकते.
नेमके कोणत्या खासदारांनी दिले राजीनामे?- लोकसभेतील दहा खासदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला. यामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, खासदार राकेश सिंह, रौती पाठक, उदय प्रताप सिंह, गोमती साई, अरुण साव, राज्यवर्धनसिंह राठोड, दीया कुमारी, किरोडीलाल मीणा यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.- खासदारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर सर्व खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले.
केंद्रीय नेतृत्व काय संदेश देणार?लोकसभा निवडणुकीसाठी पाच महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असताना, पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्यासह आपल्या सामाजिक अजेंड्याबद्दल मोठा संदेश देऊ शकतो. राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांची नियुक्त्ती होण्याची शक्यताही सूत्रांनी नाकारली नाही, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण २१ खासदारांना उमेदवारी दिली. त्यापैकी १२ जणांनाच विजय मिळविता आला आहे.
आणखी मंत्री देणार राजीनामे- बाबा बालकनाथ आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह है दोघेही दिल्लीबाहेर असल्याने राजीनामा देऊ शकले नाहीत; पण तेही राजीनामा देणार आहेत.- रेणुका सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमधील तीन केंद्रीय मंत्रीही कमी होणार आहेत.- नरेंद्रसिंह तोमर हे कृषी मंत्रालय, प्रल्हादसिंह पटेल जलसंपदा आणि अन्न प्रक्रिया मंत्रालय पाहत होते, तर रेणुका सिंह आदिवासी विभागाचे काम पाहत होत्या.